मतिमंद सविता या मुलीला मिळाली दृष्टी!लायन्स नेत्ररुग्णालयाने दाखवली सृष्टी !!
उदगीर (एल.पी. उगिले) उदगीर येथील उदयगिरि लायन्स नेत्ररुग्णालयाने जागतिक पातळीवर आपले नावलौकिक केले आहे, त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक नेत्र रुग्ण नेत्रउपचार करण्यासाठी उदगीरला येत असतात. आणि त्यांच्यावर अत्यंत योग्य पद्धतीने उपचारही केला जातो. पूर्वी शासनाकडून अनुदान मिळत होते, त्यामुळे मोफत नेत्र शस्त्रक्रिया व इतर औषधी उपचार केले जात होते. आता दानशूर व्यक्तीच्या मदतीने कमी किमतीमध्ये हे उपचार केले जात आहेत. काही गोरगरिबांसाठी आजही डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या पुढाकारातून मोफत नेत्र चिकित्सा व नेत्रशास्त्रक्रिया केली जात आहे. ही गोष्ट डॉ. संतोष मुंडे यांना माहिती होती. त्यामुळे त्यांच्याकडे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेला एक व्यक्ती जेव्हा गेला, तेव्हा त्यांनी आवर्जून डॉ. रामप्रसाद लखोटिया आणि उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
केशव दहिफळे हा परळी तालुक्यातील हाळंब येथील रहिवासी, परिस्थिती हालाखीची, त्यामुळे ऑटो चालउन परिवाराचा उदरनिर्वाह करायचा. त्याला दोन आपत्य, दुर्दैवाने दोन्ही अपत्य जन्मजात अपंग (दिव्यांग) त्यामुळे परिस्थितीशी झगडत असतानाच मोठी मुलगी सविता हिला पूर्वीच अत्यंत कमी दिसायचे, नंतर तर दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाल्याने तिला दिसणे कमी कमी होत गेले. परिस्थिती बिकट असल्याने काय करावे? समजत नसतानाच त्यांनी आपले परिचित असलेले डॉ. संतोष मुंडे यांना काही उपचार करता येईल का? अशी चौकशी केली. तेव्हा डॉ. मुंडे यांनी डॉ. लखोटीया यांच्याशी संपर्क साधला, आणि वृत्तांत सांगितला, दृष्टीदाते डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी लगेच सकारात्मक प्रतिसाद देत, नेत्र शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी उचलली. आणि स्वतः डॉ. रामप्रसाद लखोटिया, नेत्रतज्ञ डॉ. सुदाम बिरादार आणि उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांनी या परिवाराला सहकार्य केले. आणि केशव दहिफळे यांच्या मुलीला यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर दिसू लागले. एका अर्थाने ही सृष्टी पाहण्याचे सौभाग्य तिला प्राप्त झाले. याबद्दल त्या परिवारामध्ये आनंद होणे स्वाभाविक आहे. त्यासोबतच उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना देखील खूप आनंद झाला.
प्रतिक्रिया……
उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय हे डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांच्या दूरदृष्टीतून चालत असल्याने गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात प्रकाश देण्याचे काम हे करत आहे. मी उदगीरला तहसीलदार असताना प्रत्यक्ष अनुभवले आहे, कोविड काळामध्ये या रुग्णालयाने आणि रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी परिसरातील गोरगरीब जनतेला धान्य, कपडे, औषधी देऊन मदतीचा हात पुढे केला होता. परिस्थिती अत्यंत बिकट असताना या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि तज्ञ डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची काळजी न करता, कोरोना रुग्णावर उपचार केले. हे मी अनुभवले आहे. आपल्या परिसरात असलेले हे रुग्णालय जागतिक ख्यातीचे असले तरी गोरगरिबांसाठी स्वर्ग निर्माण करणारे आहे. अत्यंत माफक खर्चामध्ये शस्त्रक्रिया करून समाजसेवा करणाऱ्या या सर्व स्टाफचे मी अभिनंदन करतो.
व्यंकटेश मुंडे,
तहसीलदार परळी
प्रतिक्रिया……
डॉक्टर रामप्रसाद लखोटिया आमच्यासाठी देवच
उदगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाने एका ऑटो चालकाच्या गोरगरीब मुलीला नेत्र शस्त्रक्रिया करून पुन्हा दृष्टी दिली आहे. मानवी जीवनात डोळे हा महत्त्वाचा अवयव आहे. डोळ्याविना सृष्टी पाहणे शक्य नाही. त्यामुळे दहिफळे परिवारासाठी डॉ. लखोटीया हे देवच आहेत.
केशव दहिफळे,
दिव्यांग सविताचे वडील,
हाळंब तालुका परळी.