उदयगिरीत डॉ.बी.एम.संदीकर यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.बी.एम.संदीकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि महाराष्ट्र उदगिरी महाविद्यालय यांच्या वतीने सेवागौरव करून त्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी होते. मंचावर सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर, प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के. मस्के, उपप्राचार्य(व.म.) डॉ.एस.जी. पाटील, उपप्राचार्य (क.म.) एस.जी. कोडचे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाळकृष्ण व सौ.नीलिमा संदीकर यांचा आहेर देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.संदीकर म्हणजे विचारशील, तळमळीने काम करणारे, शिस्तप्रिय, व्यासंगी, समर्पित भावनेने काम करणारे प्राध्यापक होते, त्यांनी सांस्कृतिक विभागात दिलेल्या योगदानाचा उल्लेख प्राचार्य मस्के यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत केला. कृष्णा शिंदे, प्रा.भाताडे, प्रा.जे.आर. कांदे, प्रा.डॉ.आर.बी.अलापुरे, प्रा.डॉ.बी. एस.होकरणे यांनी प्रा.संदीकर यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी चाकूरकर म्हणाले, चांगले काम करणाऱ्या लोकांमुळेच संस्था चांगल्या घडत असतात, तेच कार्य डॉ.संदीकरांनी केले. डॉ.लखोटिया म्हणाले सकारात्मक काम करण्याचा आदर्श इतरांनी घेऊन महाविद्यालयाचा विकास साधावा. सत्काराला उत्तर देताना डॉ. संदीकर म्हणाले, आयुष्यात लाभलेल्या चांगल्या शिक्षकांमुळे आपला पाया पक्का झाला. त्याबरोबरच उदयगिरीतील सर्व सहकारी प्राध्यापकामुळे सेवेची 36 वर्ष कशी संपली हे कळले सुद्धा नाही. येथील संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी संस्थेचे सदस्य, प्रा.मनोहर पटवारी यांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात मानकरी म्हणाले, कुशल प्रशासक, सुस्वभावी व्यक्तिमत्व, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या हातोटी मुळे सेवाकाळात संदीकरांनी महाविद्यालयाचा लौकिक वाढवला. सूत्रसंचालन स्टाफ सेक्रेटरी तथा ग्रंथपाल डॉ.लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी केले तर आभार प्रा.नागनाथ खांडेकर यांनी मानले.