प्राणी मित्रांच्या मदतीने उदमांजराची सुटका
अहमदपूर (गोविंद काळे) : पिकाच्या संरक्षणासाठी पिकाभोवती लावण्यात आलेल्या जाळीत एक उदमांजर गुरुवारी अडकल्याचे हिप्परगा कोपदेव येथील एका शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ प्राणीमित्रांच्या मदतीने जाळ्यात अडकलेल्या उदमांजराची सुटका केली.
तालुक्यातील हिप्परगा कोपदेव गावातील अकबर शेख यांच्या शेतात पिकांची नासधूस होऊ नये म्हणून पिकासभोवती लावण्यात आलेल्या जाळ्यात उदमांजर अडकलेले दिसून आले असता, अरमान शेख यांनी लागलीच वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी लातूर अंतर्गत काम करीत असलेले सर्पमित्र अमोल शिरूरकर, अशोक कांबळे, ऋषिकेश बनसोडे यांना संपर्क साधला असता सर्पमित्र शिरूरकर ग्रुपची टीम त्या गावात जाऊन जाळ्यात अडकलेल्या उदमांजराची सुटका केली. यावेळी शिरुरकर ग्रुपने उदमांजराचा रंग साधारण काळसर मातकट असतो. त्याच्या पाटीवर मातकट रंगाचे काळे पट्टे असतात, या प्राण्याला लांब शेपटी असते व टोकाकडे काळसर असलेली मातकट शेपटी झुपकेदार असते. या प्राण्याची लांबी दोन ते अडीच फूट असून याचे वजन चार ते पाच किलो असते. हा प्राणी निशाचर असल्यामुळे मानवी वस्तीजवळ व जंगलामध्ये आढळतो. दिवसभर झाडावरील ढोलींमध्ये आराम करून रात्रीच्या वेळी खाद्याच्या शोधात फिरतो. हा प्राणी खूपच लाजणारा आहे. हा प्राणी शाकाहारी तसेच मांसाहारी आहे. झाडाची फळे, फुले, खेकडे,
उंदीर, बेडूक, किडे, पाली, पक्षी व त्याचे अंडी
खातो. या प्राण्याची मादी २ ते ५ पिल्यांना जन्म देते अशी माहिती सांगितली.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे साप, पशु, पक्षी, प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात. आपल्या परिसरात प्रामुख्याने चार विषारी साप आढळतात. त्यात नाग, मण्यार, फुरसे, घोणस, तरी शेतकऱ्यांनी शेतात काम करीत असताना घनबुट, हातमोजे वापरावे. सर्पमित्र शिरूरकर ग्रुपने आतापर्यंत चाळीस हजार साप तसेच मोर, हरीन, घोरपड, मगर, उदमांजर, घुबड, अश्या वन्यजीव पशु प्राण्यांना जीवनदान दिले आहे. आपल्या परिसरात साप अथवा जखमी पशु प्राणी दिसून आल्यास न घाबरता न मारता आमशी संपर्क साधावा असे आवाहन सर्पमित्र अमोल शिरूरकर यांनी केले.