लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची – पॅन्थर नेते निवृत्ती सांगवे
उदगीर (एल. पी. उगीले) : लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना संविधानाने दिलेल्या अधिकार अबाधित राहण्यासाठी महाविकास आघाडी जिंकणे गरजेचे आहे, असे विचार पॅंथर नेते निवृत्ती सांगवे यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील दलित मुस्लिम ऐक्य परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.
वेळोवेळी राज्यघटनेमध्ये केले जाणारे बदल, आपल्या सोयीचे राजकारण करण्यासाठी दलित, मुस्लिम, उपेक्षितांचे हक्क मारण्यात पटाईत असलेल्या केंद्र शासनाला सर्वसामान्य माणसाची ताकद दाखवून देण्याचे एकमेव हत्यार म्हणजे निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बसवराज पाटील नागराळकर, मांजरा सहकारी साखर कारखान्याचे रवी काळे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख अनिल पंचाक्षरी, काँग्रेसच्या युवा नेत्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मंजूर खा पठाण, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बंटी घोरपडे, एम आय एम चे नेते मुकरम जागीरदार, अयाज जहागीरदार यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, दलित मुस्लिम ऐक्य परिषद, राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना सांगवे म्हणाले की, उदगीर विधानसभा मतदारसंघ हा समाजवादी विचारधारा जपणारा परिसर आहे. मतदारांच्या दुर्दैवाने गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला विजयी केले. मात्र दुर्दैवाने ते पुन्हा भाजप प्रणित सत्तेत सहभागी झाले. एका अर्थाने हा मतदारांचा घोर अपमान आहे. याची जाणीव ठेवून लातूर लोकसभा मतदारसंघातील इतर विधानसभा मतदारसंघा पेक्षा उदगीर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उच्चविद्याविभूषित सामाजिक जाणीव जपणारे उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून द्यावे, आणि त्यासाठी दलित मुस्लिम ऐक्य परिषदेचे सर्व कार्यकर्ते जीवाचे रान करून संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय दलित अधिकार मंच चे संस्थापक अध्यक्ष विधायक जिग्नेश मेवाणी हे सतत समाजवादी विचारधारेसोबत असल्यामुळे या परिसरातील दलित मुस्लिम ऐक्य परिषद आणि राष्ट्रीय दलित अधिकार मंच आपली शक्ती दाखवून देईल. यासाठी सर्वांनी आपण स्वतः उमेदवार आहोत, असे समजून कामाला लागावे. असेही आवाहन त्यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मुस्लिमांना पूर्वीच्या सरकारने दिलेले आरक्षण गोठवले आहे, ज्या आरक्षणाला न्यायालयाने ही हिरवा कंदील दाखवला होता, ते आरक्षण गोठवण्याचा कसलाही अधिकार नसताना देखील या सरकारने मुस्लिमांचे आरक्षण गोठवून मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहात येण्यापासून रोखले आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. मराठा समाजाला देखील आरक्षण देण्याच्या मोठमोठ्या गप्पा मारून ऐनवेळी तांत्रिक अडचणीत येईल अशा पद्धतीच्या आरक्षण जाहीर केले आहे, त्याबद्दलही मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. या सर्व गोष्टींची जाण ठेवून सुजाण मतदारांनी योग्य उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असेही आव्हान त्यांनी केले. या बैठकीचे सूत्रसंचालन राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे बंटी घोरपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन एमआयएमचे नेते मुकरम जागीरदार यांनी केले.