हत्तीबेट गडावर सोहमपुरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा
जिल्हाभरातील भाविक भक्त उपस्थित राहणार
उदगीर (एल.पी.उगीले) : देवर्जन (ता.उदगीर) येथील ब वर्गीय तीर्थक्षेत्र हत्तीबेट गडावर मंगळवारी रोजी सद्गुरू सोहमपुरी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हाभरातील सोहमपुरी महाराजांचे भक्तगण हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. उदगीर भागातील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भरत चामले, देवर्जनचे सरपंच अभिजीत साकोळकर, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष दयानंद रोडगे, माजी उपसभापती ईश्वर खटके, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश खटके, उषा रोडगे, प्रताप शिवशिवे, मनसेचे तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, बाजार समितीचे संचालक वसंत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
अहमदनगर येथील संजीवनी गडाचे महंत शंकर भारती महाराज यांच्या हस्ते विधी पूर्ण होणार आहे. यावेळी सोहमपुरी मठ संस्थान काटेजवळगा येथील गुरुवर्य आबा महाराज, दैठणा येथील मठाधिश महारुद्र स्वामी महाराज, नळेगाव येथील शिवानंद महाराज मठाचे मठाधीश बालयोगी भगवान महाराज, कानेगाव येथील गुरुदेव मंदिराचे एकनाथ महाराज, वस्तादगड सोनवती येथील दीपक महाराज काटे, जवळगा येथील आनंद पाटील महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज हत्तीबेट गडाचे गंगा महाराज, नगर येथील मठ संस्थान तांदळीचे ओम महाराज भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवर्जन येथील भक्तगण डॉ नागोराव रोडगे, शिवाजीराव धोतरे, मदन शिंदे, हनुमंतवाडी येथील ज्ञानोबा महाराज कोंपले, नारायण कोंपले आदींनी केले आहे.