नऊ लाखांच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन तरुणीचा खून; मित्रांनीच केला घात

0
नऊ लाखांच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन तरुणीचा खून; मित्रांनीच केला घात

नऊ लाखांच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन तरुणीचा खून; मित्रांनीच केला घात

पुणे/लातूर (प्रतिनिधी) : पुण्यामध्ये ‘बीई कम्प्युटर्स’च्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या तरुणीचे अपहरण करून तिचा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा खून करून मृतदेह सुपा गावाजवळच्या एका शेतात जाळल्याचे आणि पुरल्याचे समोर आले आहे. विमाननगर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पोलिसानी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. या तरुणीच्या आईवडिलांकडे तब्बल ९ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३० मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास फिनिक्स मॉलजवळून तिचे अपहरण करण्यात आले होते.

भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२ ) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदूरे या तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तिघेही मराठवड्यातील राहणारे आहेत. शिवम हा रायसोनी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञानाच्या तृतीय वर्षाला शिकतो. तर, जाधव आणि इंदूरे हे त्याचे मित्र आहेत. याप्रकरणी तिचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (वय ४९, रा. हरंगुळ, लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री मुळची लातूर जिल्ह्यातील हरंगूळची राहणारी आहे. ती वाघोली येथील जी. एस. रायसोनी महाविद्यालयात ‘बीई कॉम्प्युटर्स’चे शिक्षण घेत होती.

ही तरुणी ३० मार्च रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास कॉलेजवरुन राहत्या रूमवर आली. त्यानंतर, ती नऊच्या सुमारास फिनिक्स मॉलमध्ये गेली. मॉलमधून बाहेर पडल्यानंतर तिला शिवम, सागर आणि सुरेश या मित्रांनी सोबत नेले. त्यानंतर तिचा संपर्क तुटला. तिच्या कुटुंबीयांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्याशी संपर्क होत नव्हता. तिचा फोन बंद येत होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, तिचे आईवडील पुण्यात आले. विमाननगर येथील एका लॉजवर उतरले होते. त्यावेळी तिच्या आईच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यामध्ये ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात असून नऊ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल.’ असे नमूद करण्यात आले होते. ही बाब त्यांनी पोलिसांना कळवली. त्यानुसार, पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींनी पाठवलेल्या एका खात्यावर ५० हजारांची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली होती. तसेच, ज्या नंबरवरुन मेसेज येत आहेत त्या नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून तपासाला सुरुवात केली होती.

दरम्यान, एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून तपास करण्यात आला. त्यावेळी त्याने खुनाची कबुली दिली. ज्या दिवशी तिचे अपहरण केले त्याच दिवशी तिचा खून करण्यात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. रविवारी सकाळी पोलिसांची पथके सुपा गावाच्या हद्दीत गेली. ज्या ठिकाणी तिचा मृतदेह पुरण्यात आला त्याठिकाणी अत्यंत विदारक चित्र पहायला मिळाले. दरम्यान याठिकाणी पंचनामा करण्याचे काम सुरु करण्यात आले.

आरोपींना पैशांची आवश्यकता होती. सागर आणि सुरेश हे कर्जबाजारी झालेले होते. त्यांना भाग्यश्रीच्या कुटुंबियांबाबत माहिती होती. त्यांच्याकडून पैसे मिळू शकतात असे त्यांना वाटले. भाग्यश्री ही त्यांच्यावर विश्वास ठेवणारी होती. तिला ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून आरोपींनी खंडणीसाठी निवडले. त्यानंतर तिचे अपहरण करून खून केला. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *