महाविकास आघाडीला सर्वाधिक मताधिक्य देऊ – सांगवे

0
महाविकास आघाडीला सर्वाधिक मताधिक्य देऊ - सांगवे

उदगीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजीराव काळगे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा उदगीर नगर परिषदेचे माजी नियोजन व विकास सभापती निवृत्ती सांगवे यांनी व्यक्त केला. उदगीर शहरांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना सिद्धार्थ सोसायटी येथे संवाद बैठकीचे आयोजन केले होते, त्यावेळी उदगीरच्या विविध प्रभागातून अनेक लोक उपस्थित होते. ती उपस्थिती पाहून निवृत्ती सांगवे यांनी सांगितले की, संवाद बैठकीसाठी जर इतकी मोठी जनसंख्या येत असेल तर, एखादी सभा आयोजित केल्यानंतर लोक किती येतील? याचा अंदाज लावलेला बरा. उदगीरकरांना शांती पाहिजे. धर्मा धर्मात तेढ निर्माण करणारी विचारधारा नको आहे. त्यामुळे उदगीर मतदार संघातील सुजाण जनता महाविकास आघाडीच्या सोबत राहील, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

उदगीर ची समाजवादी विचारधारा कोणी बदलू शकत नाही — माजी नगराध्यक्षा बलिगाबी

उदगीर विधानसभा मतदारसंघ हा समाजवादी विचारधारा मानणाराच आहे. राजकारण करत असताना एखादा नेता या पक्षातून त्या पक्षात गेला, म्हणून कोणताही बदल होत नाही. कारण असे दल बदलू आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी गेलेले असतात. ज्या मतदारांनी इतके दिवस विश्वास ठेवून वेगवेगळी पदे भोगायला दिली. त्या पक्षाला आणि त्या मतदारांना न विचारता जातीयवादी विचारधारा मानणाऱ्या पक्षात जर कोणी जात असेल तर समाजवादी विचारधारेची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. असे विचार माजी नगराध्यक्ष बलिका बी सय्यद यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या संवाद बैठकीच्या निमित्त आयोजित फुलेनगर येथील बैठकीत त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष हा सर्वधर्मसमभाव ही विचारधारा घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस मुक्त महाराष्ट्र ही घोषणा पोकळ आहे. काही स्वार्थी आणि भ्रष्टाचारी नेत्यांचा भ्रष्टाचार उघड करण्याची धमकी देऊन, तर काहींना वेगवेगळ्या पदाची लालसा देऊन भलेही भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्ते फोडले असतील, मात्र जनतेच्या मनातील काँग्रेस पक्ष याला ते हात घालू शकत नाहीत, किंवा भारतीय जनता पक्षात गेलेल्या या नेत्यांनी कितीही उर उडवून सांगितले तरीही सर्वसामान्य जनता आता त्यांचे ऐकणार नाही. कारण हे नेते मंडळी आणि कार्यकर्ते मंडळी आपले भले करून घेण्यासाठी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आहेत. हे आता लोकांना चांगले माहित झाले आहे. उलट काँग्रेस पक्ष आता शुद्ध झाला आहे. महाविकास आघाडीमध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांना आपली ताकद दाखवायची ही संधी आहे. गेल्या निवडणुकीत वंचित आणि एम आय एम ची आघाडी होती, त्यामुळे काही प्रमाणात मुस्लिम मते विभागली गेली, आणि संभ्रम अवस्थेमुळे एक गठ्ठा मते पडली नाहीत. मात्र आता अल्पसंख्यांक समाज आपल्या हक्कासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी सोबतच राहील. असा विश्वासही याप्रसंगी त्यांनी बोलून दाखवला.

संवाद बैठकांचे सभेत रूपांतर – कल्याणराव पाटील

याच बैठकीत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील यांनी गेल्या काही दिवसातील अनुभव सांगताना ज्या पद्धतीने फुलेनगर मध्ये संवाद बैठकीचे रूपांतर सभेत झाले आहे, न बोलावता जनसमुदाय एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेला आहे. यावरून मला असा विश्वास आहे की, जनतेमध्ये मोदी सरकार बद्दल प्रचंड अक्रोश आहे, आणि तो आक्रोश आता मतपेटीतून जाहीर होणार आहे. लोकांच्या मनामध्ये खदखद आहे, खोटी आश्वासने देऊन आतापर्यंत फसगत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता लोक स्वीकारणार नाहीत. असा अनुभव आपल्याला अनेक संवाद बैठक आणि सभेमधून येऊ लागले आहे, असे ही सांगितले.

चारित्र्यसंपन्न उमेदवाराला विजयी करा – शिवाजीराव हुडे

याच बैठकीत बोलताना उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांनी यांनी सांगितले की, आता जनता हुशार झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत या प्रभागातील नागरिकांना मी चांगल्या पद्धतीने जवळून पाहिले आहे आणि ओळखले आहे. सांगवे म्हणतात त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 9, 10, 11, 1 या भागातून आलेली जनता काँग्रेस सोबतच आहे. तरीही कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सामाजिक जाणीव असलेला आणि लोककल्याणाची कामे करणाऱ्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प आपण उदगीरकरांनी केला पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे आवाहन केले.

समाजसेवा हाच माझा धर्म – शिवाजीराव काळगे

गेल्या 26 वर्षापासून लातूर जिल्ह्यात वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्यात आपला कालखंड गेला आहे. भविष्यातही गोरगरिब, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जे जे म्हणून करता येईल, ते ते करण्यासाठी राजकारणाचे माध्यम मी निवडले आहे. आपण मला आशीर्वाद दिल्यास, मी उतणार नाही, मातणार नाही, समाजसेवेचा घेतला वसा टाकणार नाही. या शब्दात शिवाजीराव काळगे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार बंटी घोरपडे यांनी मांडले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *