प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना ‘नॅशनल प्राईड अवार्ड’
अहमदपूर ( गोविंद काळे)
पश्चिम बंगाल मधील कोलकाता शहरातील सी.के.एन.के.एच. फाउंडेशन, राणीदांगा यशोदा एज्युकेशनल सोसायटी आणि विद्यासागर काॅलेज ऑफ एज्युकेशन यांच्या वतीने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत बिरादार पाटील यांना ‘ नॅशनल प्राईड अवार्ड ‘ मिळाले असून, त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी महाविद्यालयात शैक्षणिक शिस्त निर्माण करून गुणवत्तेचा ‘फुले पॅटर्न’ घडविला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने महात्मा फुले महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बी.ए. परीक्षेत सातत्याने महाविद्यालयाने यशाचा आलेख चढता ठेवला आहे.
तसेच क्रीडा क्षेत्रातही या महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. कोरोनाच्या काळापासून सातत्याने अनेक परिषदा घेऊन संशोधनाच्या क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ग्रंथांचे प्रकाशनही करण्यात आले आहे. अहमदपूर परिसरात शैक्षणिक गुणवत्तेचा ‘फुले पॅटर्न ‘ निर्माण करणारे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे नामांकित पत्रकार,लेखक, समीक्षक असून त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तसेच यापूर्वी त्यांना अमेरिकन विद्यापीठाने डी.लिट. ही पदवी देऊनही सन्मानित केले आहे. या सर्व कार्याची दखल घेत कोलकाता येथील संस्थेने त्यांना नॅशनल प्राईड अवार्ड दिल्याबद्दल किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बळीराम पवार यांनी शाल, पुष्पहार देऊन केला. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.