भुकेच्या वेदनांची कहाणी म्हणजे माकडीचा माळ – विरभद्र मिरेवाड

भुकेच्या वेदनांची कहाणी म्हणजे माकडीचा माळ - विरभद्र मिरेवाड
उदगीर (प्रतिनिधी) : भूक ही अशी बाब आहे की, तिला टाळता येत नाही. तिच्यापासून दूर पळताही येत नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. भूकच माणसाला लाचार बनवते. अशा या भुकेमुळे भटक्यांना जीवनात सोसावे लागणारे अपमानांचे क्लेश आणि सहन कराव्या लागणाऱ्या भुकेच्या वेदनांची कहाणी म्हणजे माकडीचा माळ, हि साहित्यकृती होय. असे मत प्रसिद्ध साहित्यिक विरभद्र मिरेवाड यांनी व्यक्त केले .
चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत पंडित पाटील, प्रसिद्ध बाल साहित्यिक, नांदेड. यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 321 व्या वाचक संवाद मध्ये विरभद्र मिरेवाड यानी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे लिखित माकडीचा माळ या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाले की, भविष्याचा वेध घेत वर्तमान नीट नोंदवताना आण्णाभाऊ साठे यांनी माकडीचा माळ या कादंबरीत काळगावचा फोंडा माळ आणि राधानगरीच्या माळावरील सुगीत भटक्यामध्ये होणारे भांडण तंटे ,नाथा पाटलांनी केलेली मध्यस्थी, यंकुने स्वतःचा मांडलेला संसार आणि पाताळयंत्री पाऱ्याने डाव रचून शेवटी केलेला यंकू माकडवाल्याचा अंत, हे कादंबरीचे मुख्य सूत्र आहे. हे सांगत यामधील निवडक पात्रे, कथानकाचा अन्वयार्थ, भाषा शैली, जीवनचिंतन आदी योग्य पद्धतीने मिरेवाड यांनी मांडले.
यानंतर झालेल्या चर्चेत रामभाऊ जाधव, प्राचार्य डॉ. शिवाजी सगर, प्रतिभा मुळे यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला. शेवटी अध्यक्षीय समारोपात पंडित पाटील म्हणाले की, माकडीचा माळ हि साहित्य कृती म्हणजे इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. रसिक मनाचे सुजाण वाचक उपस्थित असलेल्या या अतिउच्च दर्जा असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदाचा बहुमान मला मिळाला हे मी माझे भाग्यच समजतो.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत म्हेत्रे यांनी केले, संवादकांचा परिचय तुकाराम बिरादार यांनी करून दिला. तर आभार तुळसीदास बिरादार यांनी मानले.