महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारताचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रत्युष चिलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. तसेच आयर्न लेडी म्हणून जग विख्यात असलेल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनीही अखंड भारतासाठी योगदान दिले असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.