वाहतूक नियंत्रण व्यवस्थेचे तीन तेरा ! सिग्नल व्यवस्थेचे वाजले बारा !!
उदगीर (एल.पी.उगीले)
उदगीर शहरातील मुख्य रस्ता असलेल्या नांदेड बिदर रोडवर बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिकांना तासनतास खोळंबून राहावे लागत आहे. पायी चालणाऱ्या किंवा दुचाकी चालकांना, नागरिकांना कसरत करावी लागत आहे. मुख्य रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकी, चार चाकी वाहने नाहीतर ठेलेवाले, गाडीवाले यांनी अर्धा रस्ता आधीच व्यापलेला आहे. त्यात पुन्हा सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे आणि वाहतूक सुरळीत करावी या उद्देशाने नेमलेल्या पोलिसांचे कामकाज भलतेच चालू असल्याची चर्चा सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून जावे लागत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना रस्त्यावरून चालणे देखील शक्य होत नाही. त्यात पुन्हा ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना बाजारात खरेदीसाठी सुद्धा जाता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलीस स्टेशन समोर आणि भाजी मार्केट जवळ रहदारीची फार मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम राबवणे आवश्यक आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत पोलीस यंत्रणा कमी असल्याचे बोलले जात आहे. शहराच्या चौका चौकात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असे बोर्ड आहेत, मात्र अवजड वाहने सर्रास याच रस्त्यावरून ये जा करत असल्याने देखील रहदारीच्या ठिकाणी या वाहनांना सहजासहजी वळता येत नसल्यामुळे कितीतरी वेळ नागरिकांना प्रतीक्षा करत उभा राहावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिक वैतागले आहेत.
चौकट ……..
सिग्नल व्यवस्था फक्त नावालाच…
गेल्या कित्येक वर्षापासून उदगीर शहरांमध्ये बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागावी, या उद्देशाने ट्राफिक सिग्नल ची मागणी होत होती. कर्म धर्म संयोगाने ही यंत्रणा नगरपालिकेच्या मार्फत उभा राहिली, लाखो रुपये खर्चून उभारलेली ही सिग्नल यंत्रणा काही महिन्यातच बंद पडली. अधून मधून सुरू करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याला यश आले नाही. यासंदर्भात ना पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत आहे, ना नगरपालिका प्रशासन गांभीर्याने घेते. त्यामुळे ट्रॅफिक सिग्नल म्हणजे शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
चौकट…..
दररोज ग्राहकांच्या प्रतीक्षेत थांबलेल्या टॅक्सी कार, जीप यांच्यासाठी वाहन तळ नसल्याने त्या रस्त्याच्या कडेलाच थांबलेल्या असतात, रस्त्याच्या दोन्ही कडेला अशा पद्धतीने थांबलेल्या या वाहनामुळे हा रस्ता अर्धा व्यापला जातो आहे. तसेच पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या बँकेला देखील वाहन तळ नसल्यामुळे त्या ठिकाणची सर्व वाहने सरळ सरळ रस्त्यावर लावली जातात. त्याला देखील कोणी प्रतिबंध करत नाही, किंवा शिस्त लावत नाही. परिणामतः रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे.
चौकट….
कठोर कारवाईची मागणी….
शहरातील काही ठिकाणी प्राधान्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मार्केट, पोलीस स्टेशन समोरील चौक येथे सतत वाहतूक जाम होते, तर देगलूर रोड या भागातून होणारी अवैध प्रवासी वाहतूक थांबे हे देखील काही प्रमाणात या रहदारी मध्ये अडथळे निर्माण करत आहेत. त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने गांभीर्याने या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर या शहरांसाठी ये जा करतात. त्या देखील रहदारीला अडथळा करण्याचे एक कारण ठरू लागले आहे. त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याशिवाय गैरशिस्त वाहतुकीला शिस्त लागणार नाही .असेच बोलले जात आहेत.