उदयगिरीच्या वतीने दिवाळीत वाढलेल्या प्रदूषणाचे सर्वेक्षण संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असला, तरी त्यासोबत येणाऱ्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना होत आहे. याच पार्श्वभूमीवर एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर 2024 दरम्यान उदगीर शहरात ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे सर्वेक्षण करण्यात आले.
सदर सर्वेक्षणासाठी शिवाजी चौक, अडत लाईन, कॅप्टन चौक, उमा चौक आणि बिदर गेट या पाच ठिकाणांची निवड करण्यात आली. या ठिकाणी ध्वनी प्रदूषणाच्या मोजणीत सर्वच ठिकाणी आवाजाची पातळी चाळीस ते साठ डेसिबलच्या मानकापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः शिवाजी चौकात ध्वनी प्रदूषणाचा स्तर शंभर पंधरा डेसिबलपर्यंत पोहोचला, ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
वायू प्रदूषणाच्या बाबतीत गंधक आणि नायट्रोजन या प्रदूषकांचे प्रमाण देखील चिंताजनक उच्च स्तरावर आढळले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार, रहिवासी भागातील गंधकाची पातळी ऐंशी मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर (चोवीस तासांसाठी) असावी लागते, मात्र उदगीरमध्ये हे प्रमाण पंच्याऐंशी मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर पर्यंत वाढले आहे. त्याचप्रमाणे नायट्रोजनची पातळीही ऐंशी मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर (चोवीस तासांसाठी) असावी, मात्र ती नव्वद मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपर्यंत नोंदवली गेली आहे.
या प्रदूषणाच्या स्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागातर्फे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस .जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे. एम. पटवारी, प्रा. डॉ. आर. के. नारखेडे, नितीन चोळकर, मनोहर नावंदे यांनी केले.