जनतेच्या आग्रहास्तव निवडणुकीस उभा आहे – पत्रकार परिषदेत बालाजी पाटील चाकुरकर यांचे प्रतिपादन
अहमदपूर ( गोविंद काळे) माझ्या ईमानदारी आणि प्रामाणिकपणे केलेल्या मागील कार्याची दखल घेवून मतदार संघातील जनतेनी मला निवडणुकीस उभे राहण्यासाठी आग्रह केला म्हणून मी निवडणुकीस उभा आहे असे प्रतिपादन अहमदपूर – चाकूर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणुन उभे राहिलेले बालाजी पाटील चाकुरकर यांनी केले.
ते दि. 06 नोव्हेंबर 2024 रोजी घाटोळ कॉम्पलेक्स मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कार्यकर्ता भिंगोले, सुरज कापडे, अक्षय केदारअप्पा काडवदे, बालाजी काडवदे, प्रशांत भिंगोरे, बालवाड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना बालाजी पाटील चाकुरकर म्हणाले की, अहमदपूर-चाकूर विधानसभा निवडणुक प्रचार कार्य सुरु झाले असुन मतदार संघात फिरत असताना जनतेचा उर्त्स्फुत प्रतिसाद मला मिळत आहे. मी 35 वर्ष भाजपाचा सच्चा कार्यकर्ता म्हणुन आजतागायतपर्यंत कार्य केले आहे. परंतु आजचा भाजप पक्ष भ्रष्टाचारवाद्याबरोबर युती केल्यामुळे भाजपामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मानसिकता बदलली आहे. मी जेंव्हा प्रत्येक गावात फिरतो तेंव्हा जनता म्हणजे की पक्ष जर सच्चा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडत असेल तर आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. मतदार संघातील 224 गावातील जनतेनी मला अपक्ष थांबण्याचा सल्ला दिला आहे. अपक्ष थांबा परंतु माघार घ्यावयाची नाही असे मला माझ्या समवेत असलेले कार्यकर्ते बोलत आहेत. म्हणुन मी या निवडणुकीला उभा राहिलेलो आहे. आज काही लोक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. 5 ते 6 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये वाजत-गाजत मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी मतदार संघातील मतदार राजाच्या इच्छेनुसार उभा राहिलो आहे. मला बरेच फोन आले एक तर फोन असा आला की साहेब माघार घेतलात तर मी आत्महत्या करीन. म्हणुन जनतेच्या आग्रहाखातर मी या निवडणुकीस उभा आहे. मी जर या निवडणुकीत निवडणुन आलो तर पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये 50 वर्षाचे काम करणार आहे. आणि त्याच अनुषंगाने मला प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले आहे. कमी वेळेमध्ये ज्याप्रमाणे प्रेशर कुकर कार्य करते अगदी तसेच मी सुद्धा कमी वेळेमध्ये जास्त काम करुन दाखविणार आहे. स्वातंत्र्यानंतर 62 वर्षामध्ये काय विकास झाला. पश्चिम महाराष्ट्रातील 1 एकर जमीन असलेला शेतकरी आज गाडीमध्ये फिरतो आहे मात्र महाराष्ट्रातील शेतकरी हा आत्महत्या करत आहे. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आहे अगदी त्याच प्रमाणे मी मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी कार्य करणार आहे. 15 टक्के रस्ते चांगले आहेत. झालेल्या रस्ते उखडुन गेले, दोन वर्षामध्ये पुन्हा रस्ता दुरुस्ती, हे सर्व थांवणार असुन शाळा, पुल, धरण यांचे कार्य गेल्या 62 वर्षामध्ये निकृष्ठ झाले आहे. हे सर्व मी थांबवुन सिंचन क्षेत्राचा विकास करणार आहे. मागील 62 वर्षाचा अनुषेश मी भरुन काढणार आहे. मला जर जनतेनी विधान भवनामध्ये पाठविले तर मी रणकंदन करणार आहे. मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. आरोग्याचा खुप मोठा गंभीर प्रश्न आहे यासाठी मी कार्य करणार आहे. वसुंधरारत्न, राष्ट्रसंत परम पुज्य शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभा करणार आहे. लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे कार्य प्रलंबित आहे यासाठी मी कार्य करणार आहे. मुस्लिम बांधवासांठी शादीखाना निर्माण करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ आदर्श वाचनालयाची स्थापना करणार आहे. तसेच पत्रकार बांधवांसाठीही पत्रकार भवन बांधुन देण्यासाठी कटिबद्ध आहे. संपुर्ण बंजारा समाज माझ्या पाठीशी आहे यांच्या विकासासाठी मी वचनबद़ध आहे. यह तो अंदर की बात है सब जनता हमारे साथ है असे म्हणत बालाजी पाटील चाकुरकर यांनी सर्व जाती धर्मांना एकत्रित घेवून या मतदार संघामध्ये समतेचे बीज पेरणार आहे. भाजपासमवेत इतर पक्षाचे कार्यकर्ते आज माझ्या सोबत आहेत असेही ते शेवटी म्हणाले.
सदरील पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक अक्षय केदारअप्पा काडवदे यांनी केले. यावेळी अहमदपूर –चाकुर परिसरातील कार्यकर्ते, पत्रकार यांनी उपस्थिती होती.