आदिवासी बोली व लोकसाहित्य संशोधन समितीच्या अध्यक्षपदी डॉ.साहेब खंदारे
अहमदपूर (गोविंद काळे) : अमूर्त संस्कृतीचे संशोधक तथा लोक साहित्याचे अभ्यासक डॉ. साहेब खंदारे यांची आदिवासी बोली व लोक साहित्य संशोधन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. डॉ.खंदारे यांचे अमूर्त संस्कृती आणि लोकसाहित्य यावर देश विदेशात मोठे संशोधनात्मक काम असून त्यांच्या नियुक्तीमुळे मराठवाड्यातील आदिवासी बोली आणि लोकसाहित्य यावर मोठे काम होईल असा विश्वास आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत डॉ.खंदारे यांची एक मताने निवड झाली असून याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
डॉ. खंदारे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कला शाखेचे अधिष्ठाता म्हणून देदीप्यमान कारकीर्द राहिली असून त्यांच्या अनेक ग्रंथांना राज्य शासनाचे मानाचे पुरस्कार प्राप्त आहेत.
डॉ. खंदारे हे अहमदपूर येथे आले असता त्यांचा कवी राजेसाहेब कदम आणि प्रा. अनिल चवळे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.