जगाचा कोरोना संपला, पण आमच्या गरीबीचा कोरोना कधी संपणार? – तुकाराम बिरादार
उदगीर (एल.पी.उगीले.) : आजपर्यंत अनेक भयान संकटाचे आघात सहन केलेल्या आपल्या देशाने कोरोना 19 या नैसर्गिक आपत्तीचा आघातही सहज सहन केला. परंतू पिढ्यानपिढ्या जो समाज गरिबी, लाचारीच जगणं जगत आहे, त्यांचा सामाजिक कोरोना महाभयंकर आहे. अन्न पाण्याविना मरणे, घरा विना राहणे, अनेक संकटाचे सहने, रुढीपरंपरा, सामाजिक,राजकीय, धार्मिक दारिद्र्य या बरोबरच अधिकारी व पदाधिकाऱ्यांची भ्रष्टाचारी व अमानुष प्रवृत्ती इत्यादी गरिबीवरील अन्याय अत्याचाराविरुद्ध समाजाने विचारलेला प्रश्न, जगाचा कोरोना संपला, पण आमच्या गरीबीचा कोरोना कधी संपणार? असा प्रश्न विचारणारी साहित्यकृती म्हणजे गरिबीचा चिरंतन कोरोना होय. असे मत प्रसिद्ध साहित्यिक तुकाराम बिरादार यांनी व्यक्त केले.
शिवशंकर पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 326 व्या वाचक संवाद मध्ये तुकाराम बिरादार यांनी गरिबीचा चिरंतन कोरोना या विलास माने लिखित साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाले, कोविड-19 अर्थात कोरोना ही नैसर्गिक आपत्ती व काल्पनिक तकलादू होती तर गरिबी, भूकमारी, अशिक्षितपणा, बेरोजगारी, अन्याय- अत्याचार, लाचारी इत्यादी कोरोना पेक्षा भयंकर आहेत. या अनुषंगाने लेखकाने मांडलेल्या भूमिका ह्या इमानदार, उपकाराच्या नोंदी चिंतलशील आहेत. दारुड्या, लफडे करणारा तंटामुक्तीचा अध्यक्ष , समाज व्यवस्थेतील कुरुपता, नागडी दुर्गामती, गरिबीची दयनीय अवस्था प्रखरतेने मांडलेत. ज्यांना खाण्यासाठीच थाळी नाही त्यांनी तुमच्यासाठी थाळी कशी वाजवावी, कोरोनाच्या काळात सरकार पुढारी व उपाययोजनेतील विसंगती आणि भ्रष्टाचार यावर प्रकाश टाकत भोगलेपणाचे भांडवल घेऊन दारिद्र्याचा प्रश्न मांडतात. कोरोना काळात हृदयामध्ये माणुसकीचा अंकुर फुलवून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या कोरोना योद्धांना व नाहक बळी गेलेल्या बहुजनांना हि साहित्यकृती समर्पित केली आहे.
वाचक संवादावेळी प्राचार्य डॉ.शिवाजीराव सगर, तुळसीदास बिरादार , मोहन निडवंचे, कचरूलाल मुंदडा, मुरलीधर जाधव, हनुमंत म्हेत्रे व बाबुराव सोमवंशी यांचेसह अनेकांनी चर्चेत सहभाग नोंदवला. अध्यक्षीय समारोप करताना शिवशंकर पाटील लोहारकर म्हणाले गरिबी हा काळजाला भेदणारा प्रश्न असुन भूकमारी, अशिक्षित पणा, बेरोजगारी आणि अन्याय अत्याचार, सहन करावा लागणारा कोरोना, सरकार व प्रस्थापितांच्या विरुद्ध भूमिका मांडत सर्व शोषितांची बोलकी वेदना लेखकाने व संवादकानेही मांडली आहे.
शासकीय दुध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात अंतर्गतच्या या वाचक संवादचे सूत्रसंचालन ज्योती डोळे यांनी केले, संवादकांचा परिचय रामभाऊ जाधव यांनी तर आभार वीरभद्र स्वामी यांनी मानले.