उदयगिरीत इंग्रजी विभागाच्या वतीने सुजाउद्दिन निजामुद्दीन छप्परबन यांचे विशेष व्याख्यान संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने दिनांक 28 व 29 नोव्हेंबर 2024 रोजी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात येथील ‘सेंटर फॉर डायसपोरा’ विभागातील सुजाउद्दीन निजामुद्दीन छप्परबन यांचे विशेष व्याख्यान पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. त्यांनी ‘डायसपोरा अँड कल्चरल स्टडीज’ या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभागप्रमुख डॉ. संजीव सूर्यवंशी हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. व्ही. डी. काकनाळे, प्रा. पी. व्ही. आंबेसंगे, प्रा. शिवनंदा रोडगे यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. सुजाउद्दीन निजामुद्दीन छप्परबन म्हणाले, शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार प्राप्ती करण्यासाठी देश सोडून अनेकांना विदेशात जावे लागते असे जरी असले तरी तेथील राहणीमान, खानपान व आपल्या देशातील संस्कृती विषयीचा अभिमान यांचा एक संगम अनेक परदेशी शिक्षण घेणाऱ्यांमध्ये पाहता येतो. भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अनेकजण आपापल्या पातळीवर खूप प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृती असून विदेशातील लोकदेखील याकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. सूर्यवंशी म्हणाले, इतर संस्कृती अभ्यासताना भारतीय संस्कृतीशी नाळ जोडून ठेवणे, ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शादुल शेख यांनी तर आभार प्रा. शिवनंदा रोडगे यांनी केले.