मस्साजोग प्रकरणी पोलिसांकडून अक्षम्य तिरंगाई, मुख्य आरोपी मोकाट हे शासनाचे अपयश – स्वप्निल जाधव
उदगीर (एल.पी.उगीले)
बीड जिल्ह्यातील मस्साजोग तालुका केज येथील सरपंचाची हत्या होऊन 19 दिवस होत आले, तरी अद्याप मुख्य आरोपी फरारच आहेत. ही गोष्ट जशी पोलीस प्रशासनाला लाजिरवाणी आहे, तसेच ती सरकारला देखील अकार्यक्षम ठरवणारी आहे. सरकारने युद्ध पातळीवरून या प्रकरणाचा शोध करण्याचे आदेश द्यावेत, आणि मराठवाड्यामध्ये पसरलेला असंतोष दूर करावा. अशी मागणी युवा नेते स्वप्निल जाधव यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे पहिल्यांदा अपहरण केले गेले, त्यानंतर त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. याप्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी पकडले असले तरी मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये राज्य कायद्याचे आहे की, गुंडाचे आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीरपणे कोणालाही सोडणार नाही, सर्वांना शिक्षा होईल. असे सांगितले असले तरीही प्रत्यक्षात मात्र तपासामध्ये शून्य प्रगती असल्याची टीका बीड जिल्ह्यामध्ये सर्वच जण करत आहेत. मात्र पोलीस प्रशासन या गोष्टीकडे कानाडोळा करत आहे की काय? सामान्य माणसाला जर न्याय मिळत नसेल तर हे राज्य कायद्याचे आहे असे म्हणता येणार नाही. असेही विचार स्वप्नील जाधव यांनी सदर निवेदनामध्ये नमूद केले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून अनेक गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे आशीर्वाद तर नाहीत ना? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात असल्याची टीका स्वप्नील जाधव यांनी उपस्थित केली आहे. कारण जिल्ह्यातील अनेक प्रकरणे हे प्रलंबित असून पोलीस प्रशासन अधिक तपास चालू आहे, अशा गोंडस शब्दात सर्व काही गुंडाळून टाकत असल्याची ती काही युवा नेते स्वप्निल जाधव यांनी केली आहे.
या संदर्भात आमदार धस यांनी खूप गंभीरपणे आरोप केले आहेत. त्यांनी तर मागील काळामध्ये पालकमंत्री पद हे भाड्याने दिले होते की काय? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला होता, असे सांगून अजूनही परिस्थिती तीच आहे की काय? असेही बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस बोलू लागला आहे. ही परिस्थिती बदलून सामान्य माणसाला विश्वास बसेल अशा पद्धतीचा तपास करावा आणि मुख्य आरोपीला अटक करून शासनाने कर्तबगारी दाखवावी. कारण जोपर्यंत मुख्य आरोपी मोकाट आहेत, तोपर्यंत या प्रकरणावर पोलीस प्रशासन आणि शासन यांच्यावर कायम टीका होत राहील. याप्रकरणी पोलीस खात्यातील वरिष्ठांनी आणि शासन स्तरावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिशः लक्ष देणे गरजेचे असल्याचेही स्वप्निल जाधव यांनी नमूद केले आहे.