पर्यावरण संरक्षण आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा पाया सायकलींग – सुनील ममदापुरे
उदगीर (एल.पी.उगीले) सध्या निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. या गोष्टीचे गांभीर्य माणसांनी विचारात घेणे गरजेचे आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन आणि कार्बन डाय-ऑक्साइड वेगवेगळ्या वाहनाच्या माध्यमातून सोडले जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा गतीने ऱ्हास होतो आहे. ज्याचा परिणाम मानवा सोबतच इतर सजीव सृष्टीच्या आरोग्यावर होणारच, हे टाळण्यासाठी युवकांनी तरुणांनी मोठ्या प्रमाणात सायकलचा वापर केल्यास प्रदूषणाला आळा घालता येऊ शकेल. असे विचार उदगीर सायकलींग क्लब चे मार्गदर्शक सुनील ममदापूरे यांनी व्यक्त केले आहे.
उदगीर सायकलिंग क्लबच्या वतीने यावर्षी आयोध्या, प्रयागराज आणि वाराणसीला दौरा काढला आहे. जय श्रीराम चा संदेश देत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मृदा संवर्धनाचाही संदेश या सायकल यात्रेतून दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उदगीर येथून आयोध्या, वाराणसी, प्रयागराज असा प्रवास महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश मधून जातो आहे. तब्बल दीड हजार किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलस्वार पूर्ण करणार आहेत. या सायकल प्रवासाची सुरुवात उदगीर येथील दूधिया हनुमान येथून निघाली. हे सायकलस्वार आयोध्या येथील प्रभू श्रीरामाचे मंदिरात दर्शन घेऊन पुढील सुरुवात करणार आहेत. प्रवास करताना प्रत्येक शहरात रॅलीच्या माध्यमातून ते युवकांना प्रबोधन करणार आहेत.
उदगीर ते वारंगा फाटा, यवतमाळ, नागपूर, शिवनी, जबलपूर, मेहर, चाकघाट, प्रयागराज, आयोध्या, जयपूर, वाराणसी असा हा दीड हजार किलोमीटर अंतराचा प्रवास दहा दिवसात पूर्ण करणार आहेत.
साईनाथ कोरे आणि सुनील ममदापुरे यांच्या नेतृत्वाखाली सायकलस्वार 2002 पासून दरवर्षी उदगीर ते तिरुपती हे अंतर सायकलवर पूर्ण करतात. या सायकलिंग क्लब मध्ये उदगीर परिसरातील विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक हे सहभाग घेत असतात.
भक्ती पूर्ण वातावरणामध्ये सायकलस्वारांनी दरवर्षी सामाजिक आणि पर्यावरण संदेशाची जोड देऊन समाजाप्रती असलेले त्यांचे दायित्व दाखवून दिलेले आहे. त्यांचा हा आगळा वेगळा उपक्रम सातत्यपूर्ण ते राबवत आहेत. उदगीर सायकलिंग क्लबचे सायकलस्वार आता त्यांच्या मोहिमेवर निघाले आहेत. 3 जानेवारी 2025 रोजी ते श्रीराम मंदिर अयोध्या येथे पोहोचणार आहेत.
यावर्षी देखील मृदा संवर्धनाचा संदेश हे देत आहेत. ईशा फाउंडेशन चा एक आऊटरीच प्रकल्प आहे. मृदा संवर्धन आणि पुनरुज्जीवन याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हे फाउंडेशन काम करत आहे. 2017 मध्ये रामेश्वरम रॅली फोर रिव्हर्स अर्थात नद्यांसाठी रॅली, तर 2018 मध्ये महाबलीपुरम ईशा विद्या आणि 2019 – 20 मध्ये कोईमतूरला कावेरी कॉलिंग रॅली, 2021 मध्ये कन्याकुमारीला कॉन्सिअस प्लॅनेट सेव्ह सोईल तसेच 2022 मध्ये जगन्नाथपुरी येथे कॉन्सिअस प्लॅनेट सेव्ह सॉईल आणि 2023 मध्ये केरळ येथील तिरुवनंतपुरम येथे ईशा फाउंडेशनच्या सोशल आऊट्रीच प्रकल्पासाठी अशाच पद्धतीने सायकलिंग द्वारे सहभाग नोंदवून लांबचा पल्ला गाठलेला आहे. ईशा फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी व्हायचे हे त्यांचे सलग सातवे वर्ष आहे. उत्साही सायकलस्वार हाफ आयर्न मॅन विजेते गोविंद रंगवाळ तसेच योगीराज बारोळे (वय वर्ष 13) हा देखील या सायकल प्रवासामध्ये सहभागी आहे.
सायकलिंगचा एक वेगळा मापदंड निर्माण करणारे आणि उदगीरकरांची शान असणाऱ्या या टीम मध्ये साईनाथ कोरे, सुनील ममदापुरे, बबन अण्णा हैबतपुरे, विनोदकुमार टवानी, भास्कर कुंडगीर, ज्ञानेश्वर चंडेगावे, अश्विन पांढरे, नागनाथ वारद, दीपक पाटील, कपिल वट्टमवार, नितीन जुल्फे, चंद्रकांत ममदापूरे, गोविंद रंगवाळ, महेश आलमकेरे, मुकेश निरूने, रितेश तिवारी, कैलास वडजे, भीमाशंकर बहिरेवार, पांडुरंग पाटील, हरिप्रसाद दंडीमे, मुकुंद चव्हाण, विवेक बिरादार, प्रमोद मोदी, महेंद्र मादलापुरे, कपिलदेव कल्पे, सतीशकुमार बिरादार, माधव करडखेले, प्रमोद बुटले, मोरे संतोष, रामेश्वर तोंडारे, सचिन पेंदलवार, अनिल पाटील, दत्ता मुतखवार, योगीराज भारुडे, रूकमाजी चामले तसेच सहकारी म्हणून गणेश गुंडरे, सुधीर जिरोबे, माधव हलकुडे, पंडित डोईफोडे हे सहभागी आहेत. या सायकलस्वारांचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.