उदयगिरीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व माजी कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे यांना श्रद्धांजली अर्पण
उदगीर : (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संस्था व महाविद्यालयातील प्राध्यापक – कर्मचाऱ्यांच्या वतीने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे यांच्या निधनाबद्दल शोकसभा आयोजित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्था सचिव रामचंद्र तिरुके, ॲड. प्रकाश तोंडारे, प्रशांत पेन्सलवार, जगदीश बागडी, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, संग्राम हुडगे यांची मंचावर विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना संस्थाध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी म्हणाले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून डॉ. शिवराज नाकाडे यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे. संस्थेच्या विकासात त्यांचे मौलिक योगदान राहिलेले आहे. तसेच देशाची आर्थिक घडी बसविण्या मध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. संस्थासचिव रामचंद्र तिरुके म्हणाले, डॉ. शिवराज नाकाडे यांनी स्वायत्त विद्यापीठाचे पाहिलेले स्वप्न प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी पूर्ण करणे, हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली असेल. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने देशाचे अनमोल रत्न हरवले आहे, अशी भावना व्यक्त केली. प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के म्हणाले, डॉ. नाकाडे व डॉ. मनमोहन सिंग ही दोन्ही व्यक्तिमत्व म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्ता, नीतिमान नेतृत्व व प्रेरणादायी कर्तुत्वाची कायम मिसाल राहतील. त्यांनी घालून दिलेल्या संस्कार मार्गावरती सर्वांनी चालणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. यावेळी ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार, डॉ. संजय सूर्यवंशी, डॉ. मल्लेश झुंगास्वामी यांनी देखील प्रातिनिधिक स्वरूपात या दिवंगत व्यक्तिमत्वाविषयी भावांजली अर्पण केली. या शोकसभेचे संयोजन प्राध्यापक सचिव डॉ. भालचंद्र करंडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.