शहर पोलिसांकडून गुटख्यावर धाड, सहा लाख 35 हजार चा मुद्देमाल जप्त
उदगीर (एल पी उगिले)
उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू शहरातून वाहतूक करून घेऊन जात असताना एका आरोपीला मुद्देमालासह अटक करून सहा लाख 35 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
यासंदर्भात उदगीर शहर पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा शहरातून अवैध विक्रीसाठी, पुरवठा करण्याच्या उद्देशाने वाहतूक करून घेऊन जात असताना आढळून आल्याने पोलीस नाईक गजानन पुल्लेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुसेफ अखिल शेख (रा. आदत नगर, परळी वैजनाथ) याच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 334/24 कलम 123, 223, 274, 275 भारतीय न्याय संहिता व सहकलम 59 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, आरोपी हा पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्र एम एच 14 सीएक्स 89 34 या कार) मधून बाबा नवरतन पान मसाला एकूण 150 डबे, प्रति नग किंमत 280 रुपये असा एकूण 42 हजार रुपये, तसेच केसर युक्त विमल पान मसाला एकूण 624 पुडे प्रती नग किंमत 120 रुपये एकूण किंमत 74880 रुपये, V1 तंबाखू एकूण नग 624 पुडे प्रती नग किंमत तीस रुपये एकूण किंमत अठरा हजार 720 आणि हा सर्व गुटखा वाहतुकीसाठी वापरात येणारी स्विफ्ट डिझायर कार अंदाजे किंमत पाच लाख रुपये असा एकूण सहा लाख 35 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक काळे यांच्याकडे देण्यात आला आहे.