शिक्षकांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा: वंदना फुटाणे
उदगीर (एल.पी.उगीले): विकसित भारत निर्माण करण्यासाठी व मुलांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा, असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी केले.
त्या एकुर्का रोड येथे आयोजित दोन दिवसीय ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी एस. के. शेख, शिक्षणविस्तार अधिकारी नितीन लोहकरे, शिवराज थोटे, राजेंद्र मळभागे, केंद्रप्रमुख मधुकर मरलापले, अशोक खेळगे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वंदना फुटाणे म्हणाल्या की, अशा विज्ञान प्रदर्शनातून आजचे हे बलवैज्ञानिक उद्याचे मोठे शास्त्रज्ञ होऊ शकतात. यासाठी हे विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे आहे.
यावेळी नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पहिले तालुकास्तरीय उल्लास मेळावा आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत मतदान प्रक्रिया जनजागृती करण्यात आली. प्रास्ताविक विस्तार अधिकारी नितीन लोहकरे यांनी केले. सूत्रसंचालन रसूल पठाण यांनी केले. तर आभार केंद्रप्रमुख मधुकर मरलापले यांनी मानले. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिक एकूण ६९ तर शिक्षकांचे ७ प्रयोग दाखल झाले असून हे प्रयोग पाहण्यासाठी तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा भेट देणार आहेत. यासाठी पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, प्रा. एम. व्ही. स्वामी, व्यंकटेश पेद्दवाड, साबेर दायमी, डॉ. ज्ञानोबा मुंढे यांच्यासह गटसाधन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांनी पुढाकार घेतला.