ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकात मोठी प्रतिभा : तहसीलदार राम बोरगावकर.
उदगीर (एल.पी.उगीले) : ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकात मोठी प्रतिभा असून देखील पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने ज्ञान-विज्ञाना व तंत्रज्ञानासारख्या विषयात मागे पडत आहेत. यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे मत तहसीलदार राम बोरगावकर यांनी व्यक्त केले.
ते एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित दोन दिवसीय ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात समारोप व पारितोषिक वितरण प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी एस. के. शेख, वरिष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी नितीन लोहकरे, बालाजी धमनसूरे, शिवराज थोटे, राजेंद्र मळभागे, केंद्रप्रमुख अशोक खेळगे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिक असे एकूण ६९ प्रयोग तर शिक्षकांचे ७ प्रयोग दाखल झाले होते. हे प्रयोग पाहण्यासाठी तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. माध्यमिक गटात समर्थ विद्यालय एकुर्का रोड चा प्रदूषण मुक्त सातत्यपूर्ण फ्री मिळणारी ऊर्जा हा प्रयोग प्रथम, जमहूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उदगीर चा वेस्ट मॅनेजमेंट द्वितीय, महाराष्ट्र उदयगिरी कनिष्ठ महाविद्यालय चा रूद्रा २ तृतीय तर प्राथमिक गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी चा सॅाकर रोबोट प्रथम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कल्लूर चा कार्बाइड गन द्वितीय, विवेक वर्धिनी प्राथमिक शाळा तृतीय आली आहे. दिव्यांग गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायगाव नैसर्गिक शेती हा प्रयोग उत्कृष्ट ठरला आहे. शिक्षक गटात जि. प. हायस्कूल दावणगाव च्या अश्विनी बंडप्पा स्वामी यांचा मानवी शरिर रचना व टाईम्स पब्लिक स्कूल उदगीर येथील नंदकिशोर वसंतराव पाटील यांचे गणितीय उपकरणे यांच्यासह विजेते शाळेतील बाल वैज्ञानिक, मार्गदर्शक शिक्षक यांचा रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पहिले तालुकास्तरीय उल्लास मेळावा आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत मतदान प्रक्रिया जनजागृती, निरक्षराना अक्षर ओळख, बँक व्यवहार साक्षरता आदी उपक्रम राबविण्यात आले असून या शाळांचा गौरव करण्यात आला. यात समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय एकुर्का रोड प्रथम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सताळा व्दितीय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुर्का रोड तृतीय आली असून या शाळांचा ही गौरव करण्यात आला. प्रास्ताविक विस्तार अधिकारी बालाजी धमनसूरे यांनी केले. सूत्रसंचालन रसूल पठाण यांनी केले. तर आभार केंद्रप्रमुख अशोक खेळगे यांनी मानले. तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळानी मोठी गर्दी केली होती. यासाठी पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, प्रा. एम. व्ही. स्वामी, व्यंकटेश पेद्दवाड, साबेर दायमी, डॉ. ज्ञानोबा मुंढे, विज्ञान शिक्षक किरण हाळीघोंगडे यांच्यासह गटसाधन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व समर्थ विद्यालयातूल शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.