वाढवणा परिसरातील अवैध धंद्याला विशेष पथकाची चपराक

0
वाढवणा परिसरातील अवैध धंद्याला विशेष पथकाची चपराक

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असल्याची ओरड सर्रासपणे होत असताना देखील, स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने कोणतीही कारवाई केली जात नसल्याने, आणि प्रसिद्धी माध्यमातून सतत टीका होत असल्याने शेवटी विशेष पथकालाच लक्ष घालावे लागले. विशेष पथकाने वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील शिरूर ताजबंद ते उदगीर जाणाऱ्या रोडवर वायगाव पाटी जवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीच्या हायवा टिप्पर वर कारवाई करून अंदाजे चार ब्रास वाळू ज्याची किंमत प्रतिब्रास आठ हजार रुपये प्रमाणे बत्तीस हजार रुपये आणि टाटा कंपनीचा हायवा टिप्पर ज्याची किंमत पंधरा लाख रुपये, असा एकूण पंधरा लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल विशेष पथकांनी जप्त केला आहे. अवैधरित्या उपसा करून गौण खनिज स्वतःच्या फायद्यासाठी विना पास परवाना चोरटी वाहतूक करत असताना मिळून आला आहे. वगैरे फिर्यादीचा मजकुरावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात शंकर दगडूजी परांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अन्वर फत्तेअली हवालदार याच्या विरुद्ध गु.रं.न.312 /24 कलम 303 (2), भारतीय न्याय संहिता सहकलम 48 (7), 48 (8) जमीन महसूल अधिनियम, सहकलम 4,21 गौण खनिज अधिनियम व सहकलम 3, 15 पर्यावरण अधिनियम अन्वये वाढवणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हाळी हंडरगुळी बीटचे आमदार रंगवाळ हे अधिक तपास करत आहेत.
वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले आहेत, आणि या अवैध धंद्याला पोलीस अधिकाऱ्यांचे अभय असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप आणि लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमय मुंडे हे दोघेही वरिष्ठ अधिकारी अवैध धंद्याच्या विरोधात असताना, वाढवणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मात्र खुलेआम एवढ्या मोठ्या प्रमाणात मटका, गुटखा, जुगार या पाठोपाठच वाळूमाफियाचाही खुलेआम बाजार कसा काय मांडला जात आहे? यासंदर्भात चर्चा चालू असून सध्या वाळूच्या विरोधामध्ये आणि गुटख्याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात धाडसत्र सुरू झाले आहेत. पोलीस प्रशासनातील पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक आणि पोलीस महानिरीक्षकांचे विशेष पथक त्या सोबतच महसूल विभागाचे ही पथक कार्यरत झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी या अवैध धंद्याला आळा बसेल अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *