साहित्यिक डॉ.नरसिंग कदम यांचा सत्कार संपन्न
उदगीर – विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई वाई च्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कवी, कथाकार, वात्रटिकाकार, समीक्षक तथा संपादक साहित्यिक डॉ.कदम नरसिंग अप्पासाहेब यांचा उज्वल ग्रामीण महाविद्यालय घोणसी येथील मराठी विभाग प्रमुख तथा कथाकार,समीक्षक डॉ.वनमाला लोंढे यांनी यथोचित सत्कार केला.यावेळी राजू घोडके, स्वाती घोडके, वनमाला लोंढे यांच्या मातोश्री इंदिराबाई लोंढे यांची उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना डॉ.कदम म्हणाले, आपण केलेला सन्मान हा मला मिळालेल्या समितीपेक्षा, पुरस्कारापेक्षा खूप मोठा आहे. या सत्कारातून ज्या प्रेरणा मिळतात त्या प्रेरणेमुळे माझ्या कामांमध्ये प्रगती होते, वेग वाढतो,आणखी कार्य करण्याची उमेद मिळते. त्यामुळे आपल्या शुभेच्छा,आपल्या प्रेरणा माझ्या पाठीशी सतत असाव्या जेणेकरून मला यशाचे उच्च शिखर गाठण्यासाठी बळ मिळेल असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.वनमाला लोंढे यांनी त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला ग्रामीण भागातील जीवन जाणिवांचे वेगळेपण मांडणारा गावभेट हा कथासंग्रह भेट दिला. त्या ग्रंथाची पाठराखण साहित्यिक डॉ.नरसिंग कदम यांनी केलेली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनमाला लोंढे यांनी,सूत्रसंचालन राजू घोडके यांनी तर आभार स्वाती घोडके यांनी मानले.