मी सदैव खेळाडूंच्या पाठीशी : माजी क्रीडा मंत्री आ.संजय बनसोडे

0
मी सदैव खेळाडूंच्या पाठीशी : माजी क्रीडा मंत्री आ.संजय बनसोडे

व्हाॅलीबाॅलच्या राज्यस्तरीय स्पर्धा उदगीरला घेणार

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील जिल्हा परिषदेचे मैदान, जे आता तालुका क्रीडा संकुल या नावाने ओळखले जात आहे. या मैदानावर मागील काळात विविध स्पर्धा झाल्या असुन, यामध्ये कुस्ती, फुटबाॅल व क्रीकेट या स्पर्धेसह अनेक खेळांच्या स्पर्धा झाल्या आहेत.
येथे होत असलेली १९ वर्ष वयोगटातील चौथी राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेचे आयोजन याच मैदानावर झाले असल्याने आनंद वाटत आहे. भविष्यात आपण लंगडी स्पर्धेला राजाश्रय मिळवून देणार असुन मी सदैव खेळाडुंच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही माजी क्रीडा मंत्री आ.संजय बनसोडे यांनी दिली.

ते उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर लातूर जिल्हा लंगडी असोसिएशन ग्रामीण उदगीर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय लंगडी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी उद्धाटक म्हणून बोलत होते.

यावेळी देवर्जन येथील स्वातंत्र्य सैनिक शिक्षण संस्थेचे सचिव ओमप्रकाश साकोळकर, बस्वराज पाटील कौळखेडकर, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, लंगडी स्पर्धेचे महाराष्ट्र राज्य सचिव चेतन पागावार, प्रा. डॉ. बस्वराज धोतरे, रा.काँ.चे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, देवर्जनचे सरपंच अभिजित साकोळकर, तालुका क्रीडाधिकारी चंद्रकांत लोदगेकर, लातुर जिल्हा लंगडी असोसिएशनचे सचिव तथा आयोजक जयराज धोतरे, सागर राऊत, नरेश जैस्वाल, उदय जाधव, अशोक परीट आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी,
आपण क्रीडा मंत्री असताना खेळाडुंच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असुन मिशन लक्षवेध मध्ये विविध क्रीडा प्रकार आहेत. आपण क्रीडा विभागाचा मंत्री म्हणून काम हाती घेतल्यानंतर क्रीडा विभागाचे रखडलेले विविध तीन वर्षाचे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते पुण्यात वितरीत केले. यावेळी खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी सुवर्णपदक विजेत्या खेळाडुंना १ कोटी, रौप्य पदकासाठी ७५ लक्ष तर कास्य पदकासाठी ५० लक्ष व सहभागी खेळाडुंना १० लक्ष देण्याचा निर्णय आपण क्रीडा मंत्री असताना घेतला आहे. पुण्यामध्ये ऑलम्पिक भवनच्या उभारणीचे काम चालु आहे. भविष्यात उदगीर शहरात व्हाॅलीबाॅलच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेणार असुन खेळाडुंनी ध्येय, दृष्टीकोन, कृती या त्रीसुत्रांचा अवलंब करुन आपले ध्येय गाठावे. असे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी लातूर, नाशिक, नागपूर, चंद्रपूर सह राज्यातील आठ विभागातील मुले व मुलींचे संघ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *