महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत सामूहिक ग्रंथ वाचनाचे यशस्वी आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले)महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत वाचन संकल्प महाराष्ट्राचा समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक ग्रंथ वाचन उपक्रम उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमात एकूण 105 विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांसाठी विविध भाषा आणि विषयांवरील ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले होते, ज्यामुळे वाचनाची गोडी वाढविण्यास मोठी मदत झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के आणि ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार यांनी सर्व वाचकांना शुभेच्छा दिल्या व वाचनाच्या सवयीचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपक्रमांतर्गत होणाऱ्या पुढील कार्यक्रमांची माहिती देण्यात आली.या यशस्वी उपक्रमामुळे वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यास नक्कीच हातभार लागेल, असा विश्वास प्राचार्यांनी व्यक्त केला.