लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न.
उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात,भारतातील पहिल्या महिला शिक्षिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विभाग प्रमुख सुधाकर पोलावार तर,प्रमुख वक्ते म्हणून सौ.मंजुषा पेन्सलवार व सावित्रीबाईंच्या वेशभूषेत कु.श्रुती येरोळकर उपस्थित होत्या. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ. मंजुषा पेन्सलवारबाईंनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याविषयी सविस्तरपणे माहिती विद्यार्थ्यांना दिली.मुलींनीही शिक्षणाचे महत्त्व समजून घेऊन उच्च शिक्षीत झाले पाहिजे,असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात सुधाकर पोलावार यांनी परिस्थिती नसतानाही ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी खूप संघर्ष करुन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या.आज शिक्षणासाठी खूप अनुकूल वातावरण आहे.सर्व सोयी-सुविधा आहेत.सर्वांनी विशेषतः मुलींनी खूप अभ्यास करून उच्च पदावर पोहचून समाजासाठी व देशासाठी काम करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळाराम बानापुरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.