रक्तदान शिबिराच्या माध्यमातून डॉक्टर कुमठेकर यांनी सामाजिक उत्तरदायित्व जपले – डॉ. सोनकांबळे
उदगीर (एल. पी. उगीले) वैद्यकीय क्षेत्रात विश्वासहार्यता कमवत असतानाच, गेल्या 18 वर्षापासून डॉ. धनाजी कुमठेकर हे आपले बंधू कै. तानाजी पाटील बामणीकर यांच्या स्मरणार्थ मेघा क्लिनिक च्या माध्यमातून प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. तसेच याच निमित्ताने विविध रोग निदान शिबिर तसेच मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिराचेही आयोजन ते करत असतात.
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी अजून कृत्रिमरित्या रक्त बनवता आले नाही. त्यामुळे अपघातग्रस्त परिस्थितीमध्ये मानवाचा जीव वाचायचा असेल तर रक्ताची गरज असते, आणि ती गरज केवळ आणि केवळ अशा रक्तदान शिबिरातूनच पूर्ण होऊ शकते. याची जाणीव ठेवून गरीबों का मसीहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध डॉ. धनाजी कुमठेकर यांनी रक्तदान शिबिराची मोहीम हाती घेतली आहे. असे गौरवोद्गार गेल्या 25 वर्षापासून उदगीरकरांच्या सेवेत दंत सेवा देणारे सेवा रुग्णालयाचे ख्यातनाम दंत रोग तज्ञ डॉ. गोविंदराव सोनकांबळे यांनी काढले. ते मेघा क्लिनिकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटक म्हणून डॉ. विजय जाधव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून निमा या डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. राजकुमार घोन्सीकर, अहमदपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे, मादलापूरचे सरपंच उदयसिंह मुंडकर, सत्यवान बोरोळकर, राजकुमार बिरादार बामणीकर, मोहन भंडे, हनुमंत पाटील बामणीकर, चंद्रकांत कोठारे, डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. प्रदीप जटाळे, यशवंत पाटील बामणीकर, श्रीरंग ढोरे, डॉ. कालिदास बिरादार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. बाळासाहेब पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलताना डॉ. गोविंदराव सोनकांबळे म्हणाले की, उदगीर शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळापासून अत्यंत निष्ठेने आणि जनतेची सेवा करणे हीच ईश्वर सेवा आहे, असे विचार घेऊन काम करणाऱ्या डॉक्टरांची मोठी फळी उदगीर शहरामध्ये कार्यरत आहे. त्यापैकी एक डॉ. धनाजी कुमठेकर असून त्यांची लोकप्रियता मोठी आहे. त्यांच्या या समाजकार्याला डॉ. सोनकांबळे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी राधाई ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलनाचे कार्य केले. या रक्तदान शिबिरामध्ये 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग नोंदवला. याप्रसंगी राधाई ब्लड बँकेचे माधव बिरादार, सुशील साबणे, आकाश स्वामी, लक्ष्मी सूर्यवंशी, निकिता एकलिंगे यांनी ब्लड संकलनाचे काम केले. तर मधुमेह तपासणीसाठी मधुर डायबिटीज सेंटरचे मधुमेह तज्ञ डॉ. प्रशांत नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपूर्ण टीमने उत्कृष्ट सहकार्य केले.
याप्रसंगी नागोराव भंडे, शिवाजी भोळे, केरबा मामडगे, गोविंद कोंडापुरे, अनिल तोंडारे, संजय शिरसागर, किशन जाधव, व्यंकट महापुरे, प्रमोद बिरादार, साईनाथ सूर्यवंशी, बबन सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ. धनाजी कुमठेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी भोळे यांनी तर आभार नागोराव भंडे यांनी मानले.