सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा – डॉ. शरद कुमार तेलगाने
उदगीर (एल. पी. उगीले) भारताच्या एकूण प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या महिलांच्या विकासाचा पहिला टप्पा ज्यांच्यामुळे गाठला गेला, तो म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करून केलेली क्रांती होय. त्यामुळे त्या क्रांतिकारकांना भारतरत्न पुरस्कार देणे म्हणजे एका अर्थाने भारतरत्न पुरस्काराचा गौरव केल्यासारखे होईल. असे विचार उदगीर येथील जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ तथा ओम हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केले. ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते.
सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. ही आग्रही मागणी करणारे निवेदन डॉ. शरद कुमार तेलगाने, सुधाकरराव दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार पांडुरंग बिदरकर, संजय काळे, प्रल्हाद सुवर्णकार, बाबासाहेब सूर्यवंशी, बुद्धसंदेश कांबळे, अनिता बिरादार, पिंपळे गुंडन, शिवाजी गायकवाड, दीपक सावंत, बालाजी फुले इत्यादी मान्यवरांच्या स्वाक्षरीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. याप्रसंगी डॉ. शरदकुमार तेलगाने हे मार्गदर्शन करत होते.