वाचन संकल्प महाराष्ट्राचा: चरित्रग्रंथांच्या पाचभाषीय पुस्तक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा समिती तसेच राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या विशेष उपक्रमाच्या निमित्ताने पाच भाषांतील (इंग्रजी, उर्दू, कन्नड, हिंदी आणि मराठी) चरित्रग्रंथांचे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, एपीजे अब्दुल कलाम यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांवर आधारित विविध भाषांतील ग्रंथ उपलब्ध होते. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी “वाचा आणि प्रेरणा घ्या” हा संदेश देणाऱ्या या ग्रंथांचे वाचन करण्याचा संकल्प सोडला. ग्रंथ प्रदर्शनादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी उपस्थितांना वाचनाच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले. “चरित्रग्रंथ हे केवळ ज्ञानच नव्हे, तर जीवनातील प्रेरणा देणारे मार्गदर्शक असतात,” असे ते म्हणाले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना वाचनाचा मोह आवरला नाही, त्यांनी त्याच ठिकाणी बसून काही निवडक ग्रंथांचे वाचनही केले. यामुळे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या अभियानाला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथपाल डॉ.पेन्सलवार आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी भरभरून प्रतिसाद दिला.