वाचनाचे संस्कार हे वर्तनातूनच व्हायला हवेत – धनंजय गुडसूरकर
उदगीर (एल.पी.उगीले) : “वाचन संस्कार ही बोलण्याची नाही तर अनुभवण्याची कृती आहे” असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते धनंजय गुडसूरकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय विभागाच्या ‘वाचनसंकल्प महाराष्ट्राचा’ निमित्त चांदेगाव येथील ज्ञानसागर वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच विठ्ठलराव गुरमे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच चंद्रकांत शिरसे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण म्हेत्रे, जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे, भिमराव नंदगावे, दिनानाथ चपलवाड उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूर्यकांत शिरसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वाचन ही मानवी मनाची भूक असली तरी त्या भुकेला समाज माध्यमिक पर्याय मिळाल्यामुळे ग्रंथ वाचन ही चिंतेची बाब झाली आहे. मात्र चिरकाल आनंद व ज्ञान देणारे ग्रंथ हेच मानवी जीवनासाठी मार्गदर्शक आहेत. असे मत गुडसुरकर यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,. ‘वाचनसंकल्प महाराष्ट्राचा ‘या उपक्रमांमधून वाचन चळवळीला गती मिळण्याची गरज असून ती टिकविणे ही तेवढीच महत्त्वाची आहे. वाचन हा सक्तीचा विषय न राहता भक्तीचा झाला पाहिजे, त्यातून मिळणारे ज्ञान व आनंद हे मोलाचे असते, वाचनांमधून मिळणाऱ्या आनंदाची सर दुसऱ्या कशालाही येत नाही. असे गुडसुरकर पुढे बोलताना म्हणाले. ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाचन स्पर्धा घेऊन त्यातून उत्कृष्ट व वाचकांना पुरस्काराची घोषणा वाचनालयाचे सचिव चंद्रकांत शिरसे यांनी यावेळी केली. निळकंठ पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर रूपा बासरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मु.अ. संजय मोघेकर, कालिदास शिरसे, संजीवनी ददापुरे,श्यामबाला जंपावाड यांनी पुढाकार घेतला.