सावित्रीमाईच्या ज्ञानदानामुळेच महिलांच्या आयुष्यातील अंधार दूर झाला – प्रा. वर्षा बिरादार
उदगीर (एल.पी.उगीले) : एकेकाळी महिलांच्या जीवनात काळोख्या रात्री सारखा अंधार होता. पण सावित्रीमाई फुले जन्माला येऊन ज्ञानदीप पेटविले, त्यांच्या ज्ञानदानामुळेच महिलांच्या आयुष्यातला अंधार दूर करून जीवन प्रकाशमय झाले. तसेच महिलाचे जीवन चूल आणि मूल एवढेच मर्यादित होते. हे बंदिस्त जीवन शिक्षणाची दारे खुले झाल्याने महिलांच्या हातातील पाळण्याची दोरी ऐवजी झेंड्याची दोरी आली. माझ्यासारख्या सामान्य परिवारातील एक स्त्री शिक्षण घेऊन शैक्षणिक संस्थेमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थी घडविण्याचे कार्य त्या महान माऊली सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच, ही किमया शक्य झाली आहे. असे प्रतिपादन शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका सौ.वर्षा बिरादार- मरगणे यांनी केले.
मौजे अतनूर ता. जळकोट येथील जिजामाता प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ शाखा अतनूर व जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर संस्थेच्या वतीने आयोजित सावित्रीचा जागर कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुत्ती गावच्या सरपंच सौ.मीनाताई यादवराव केंद्रे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून जिजामाता शाळेचे मुख्याध्यापक एस.बी.पवार, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर, चिंचोलीचे माजी सरपंच संतोष बट्टेवाड, लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातील दहावी वर्ग मैत्रिणी ग्रुपच्या सौ.रेणुका नागलगावे, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.संध्या शिंदे, सौ.स्मिता चामले, सौ.स्मिता जाधव-पवार, सौ.शितल आरणे-गिरी, सौ.स्मिता हरकरे, सौ.स्वाती बुद्धीराज-डोंगरे, सौ.अर्चना जगताप, सौ.गीता जिरोबे, सौ.सुनिता स्वामी उपस्थित होते. यावेळी यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.