वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात – संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी
उदगीर : (एल.पी.उगीले) ग्रंथ, नियतकालिके, वर्तमानपत्र, प्रबंध, ई-बुक्स यासारख्या विविध माध्यमातून वाचकांपर्यंत माहिती पोहोचत असते. वाचनातून नवीन काहीतरी प्राप्त होते. नवनवीन संकल्पना जाणून घेण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन आवश्यक असते. वाचनामुळेच माहितीचे ज्ञानात रूपांतर होते व ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा व राष्ट्रीय सेवा योजना विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विद्वत व्याख्याना’मध्ये बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके हे होते. यावेळी व्यासपीठावर सिनेट सदस्य तथा शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील, श्री हावगीस्वामी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. अजित रंगदळ यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांनी वाचन प्रेरकाची भूमिका पार पाडावी. कारण विद्यार्थ्यांसाठी त्यांना शिकविणारे शिक्षक हेच खरे आदर्श असतात. शिक्षकांनी विविध ग्रंथांच्या वाचनातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी. स्थानिक लेखकांची पुस्तके देखील विचारांची शिदोरी पूरवत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण वाचन करावे, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. सिनेट सदस्य डॉ. विष्णू पवार म्हणाले, बुद्धी व मनाच्या सुदृढ वाढीसाठी वाचन आवश्यक आहे. पुस्तके प्रत्येक माणसाच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे वास्तववादी पुस्तके वाचण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना सचिव रामचंद्र तिरुके म्हणाले, वाचन प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविते. गुणवत्तेवर आधारित शिक्षणासाठी पुस्तक व माणसं या दोन्ही गोष्टी वाचल्या पाहिजेत. वाचन संकल्प सिद्धीस जाण्यासाठी दिवसातील किमान तीन तास वाचन करा, असा मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी तर आभार प्राध्यापक सचिव डॉ. भालचंद्र करंडे यांनी मानले.