उदगीर तालुका पत्रकार संघाचे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर,रामराव गवळी यांना जीवन गौरव पुरस्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित मराठवाडा स्तरीय सन २०२३-२०२४ चे पत्रकारिता पुरस्कार जाहीर केले असून लातूर येथील जेष्ठ पत्रकार रामराव गवळी यांना त्यांनी वृत्तपत्रक्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन ‘जीवन गौरव’ पुरस्कार घोषित झाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे, कार्याध्यक्ष ॲड. एल.पी.उगीले, स्पर्धा संयोजक प्रा.प्रविण जाहुरे, व्यंकट नेत्रगावकर यांनी जाहीर केले आहे.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गत १५ वर्षापासून मराठवाडास्तरीय उत्कृष्ठ वार्ता, शोध वार्ता या दोन गटात पुरस्कार वितरणाचे आयोजन केले जाते. पुरस्कार वितरणाचे हे १६ वे वर्ष आहे. यावर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात उत्कृष्ट वार्ता गट:- प्रथम पुरस्कार
चाकुर जिल्हा लातूर येथील दैनिक नवराष्ट्रचे प्रतिनिधी संजय पाटिल यांच्या “आईच्या प्रेमापोटी तीन मुलांनी बांधले मंदिर ” या बातमीस अर्जुन मूद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ रोख पाच हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय पुरस्कार उमरगा जि. धाराशिव येथील दैनिक दिव्य मराठीचे प्रतिनिधी आंबादास जाधव यांना “तीन वर्षात पेरु विक्रमी वाढला ” या बातमीस0 उदगीरचे जेष्ठ पत्रकार कै. नागनाथअण्णा निडवदे यांच्या स्मरणार्थ अमोल निडवदे यांच्या वतीने तीन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे वडवळ (ना) येथील प्रतिनिधी शिवशंकर टाक यांच्या ” गाव हागणदारी मुक्त होइना, हातातले टमरेल काही जाईना ” या बातमीस प्रा. प्रशांत अपसिंगेकर यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ दोन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र.
शोधवार्ता गट प्रथम पुरस्कार दैनिक दिव्य मराठीचे सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिनिधी रविंद्र सोनवणे यांच्या ” लाडकी बहिणचे नारी शक्ती ॲप बंद, महिला वैतागल्या ” या बातमीस जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ रोख पाच हजार रुपये सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, व्दितीय पुरस्कार दैनिक देशोन्नतीचे जळकोट जिल्हा लातूर येथील प्रतिनिधी संगम डोंगरे यांच्या ” जळकोट तालुका नावाला साधी बस येईना गावाला ” या बातमीस जेष्ठ पत्रकार कै.नागनाथअण्णा निडवदे यांच्या स्मरणार्थ अमोल निडवदे यांच्यावतीने रोख तीन हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र , तृतीय पुरस्कार दैनिक सकाळचे देवणी जि.लातूर येथील प्रतिनिधी बाबासाहेब उमाटे यांच्या ” शेंद्रिय शेतीतुन कुंटुंबाची कोलमडलेले आर्थिक गणित चुकले” या बातमीस राजकुमार मोगले यांच्यावतीने कै.व्यंकटराव कलप्पा मोगले यांच्या स्मरर्णार्थ दोन हजार रुपये रोख ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
परिक्षक म्हणून लातूर येथील श्याम टरके सहाय्यक संचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय लातूर, तानाजी घोलप प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी लातूर,
प्रा. डाॅ.शिवशंकर पटवारी यांनी पाहिले तर जेष्ठ पत्रकार एल.पी.उगीले, जेष्ठ पत्रकार राम हडोळे,डाॅ.धनाजी कुमठेकर व प्रा.प्रविण जाहूरे, व्यंकट नेत्रगावकर या निवड समितीने जिवन गौरव पुरस्काराची निवड केली आहे. सन २०२२ , २०२३ व २०२४ या वर्षांचे पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.