प्रशिक्षणातून घडलेली उद्यमशीलता यशाचे मानक ठरावे – प्रा. डॉ. नंदकुमार गायकवाड
उदगीर (एल.पी.उगीले) : संपादन केलेल्या ज्ञानाचा वापर करून घडविलेली उद्यमशीलता हेच पशुसखी प्रशिक्षणाच्या यशस्वितेचे मानक ठरावे, असे विचार पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी धाराशिव जिल्ह्यातील पशुसखीसाठी उदगीर पशुवैद्यक महाविद्यालयात आयोजित माविम पुरस्कृत दुसऱ्या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले.
उद्घाटन प्रसंगी मंचावर प्रमुख अतिथि म्हणून माविम धाराशिवच्या जिल्हा समन्वय अधिकारी सौ. शोभा कुलकर्णी, तसेच प्रकल्प सह-समन्वयक डॉ. नरेंद्र खोडे, प्रशिक्षण समन्वयक डॉ. शरद आव्हाड, लेखा अधिकारी तथा प्रशिक्षण सहायक प्रकाश मगर हे उपस्थित होते.
प्रा. डॉ. गायकवाड अध्यक्षीय भाषणात पुढे म्हणाले की, पशुपालन क्षेत्रात रोजगारनिर्मिती साठी कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. ज्ञान आणि कौशल्याचा वापर करून शेळीपालन अधिक फायद्याचे करून पशुसखीनी स्वतचे आणि मार्गदर्शनातून इतर शेळीपालकांचे आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले.
अधिकाधिक ज्ञानार्जनासाठी पशुसखीनी प्रशिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. असे आवाहन सौ. शोभा कुलकर्णी यांनी केले. प्रकल्प सहसमन्वयक डॉ. नरेंद्र खोडे यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षणाची रूपरेषा मांडली. प्रशिक्षण समन्वयक डॉ. शरद आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रशिक्षण पुस्तिकेचे आणि प्रशिक्षण साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी आयोजन समिती समवेत पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. अयान पाटील, डॉ. वेदान्त पांडे, आणि डॉ. सुहासिनी हजारे यांनी अथक मेहनत घेतली. प्रसंगी डॉ. विवेक खंडाईत तथा कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. संकेत नरवाडे यांनी आभार प्रकट केले