22 मोटरसायकली पळवणारा अट्टलचोर !!

0
22 मोटरसायकली पळवणारा अट्टलचोर !!

उदगीर ग्रामीण पोलिसांनी पकडलाच हरामखोर !!

उदगीर (ऍड. एल पी उगिले) समाजामध्ये सध्या सुशिक्षित बेकार, बेरोजगार असलेल्या तरुणांना झटपट श्रीमंत होण्यासाठी विना कष्टाने पैसा मिळावा, असा विचार मनात रुजत असेल तर नवल नाही. असे म्हणावे लागेल. इतपत गुन्हेगारी वाढू लागली आहे. अशाच एका गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेल्या आरोपीला उदगीर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 22 मोटरसायकली जप्त केल्या आहेत.
महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, लातूर या जिल्ह्यासह सीमा भागातूनही मोटारसायकली पळवल्या असाव्यात अशी शक्यता पोलीस प्रशासना कडून व्यक्त केली जात आहे. एकंदरीत त्याच्याकडून 22 मोटरसायकली जप्त केल्या असून, उदगीर ग्रामीण पोलिसांनी राज्यातील मोटरसायकल चोरीचे 17 गुन्हे उघड केले आहेत. या गुन्ह्यात गेला माल जप्त करण्यातही पोलिसांना यश आले आहे. भविष्यात या अट्टल गुन्हेगाराकडून अजूनही अनेक गुन्हे उघड होतील, अशी अपेक्षा उदगीर ग्रामीण पोलिसांना वाटत आहे.
उदगीर शहर हे महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे या ठिकाणी चोऱ्या करून दुसऱ्या राज्यात आश्रयाला जाण्याची प्रवृत्ती आणि गुन्हे करण्याच्या पद्धती अनेक गुन्हेगारांच्या आहेत. तशाच पद्धतीची प्रवृत्ती ठेवणाऱ्या या गुन्ह्यातील आरोपीने वेगवेगळ्या जिल्ह्यात दूरवर गुन्हे करून उदगीर तालुक्यातील ग्रामीण हद्दीमध्ये लपून राहणे पसंद केल्याचे स्पष्ट होत आहे.
यावरूनच इतर गुन्हे उघड होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मध्यंतरीच्या काळात उदगीर शहरात ठीक ठिकाणावरून मोटारसायकली पळवल्या गेल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्याच पद्धतीने उदगीर शहरातील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या समोरून जो भाग उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतो, तेथून हिरो होंडा कंपनीची एक दुचाकी 28 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पळवल्याच्या संदर्भात नांदेड जिल्ह्यातील गोपीनाथ भानुदास हिलाल याने फिर्याद दिली होती. या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून प्रभारी पदभार असलेले मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी या गुन्ह्याचा शोध लावण्याचा संदर्भात आपल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, नाना उर्फ संतोष शिंदे, नामदेव चेवले, सचिन नाडागुडे, राजू डबेटवार, राहुल नागरगोजे, बागवान इत्यादींना आवश्यक सूचना देऊन गेल्या माला संदर्भात तपास करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.

वरिष्ठ पातळीवरून होत असलेल्या सततच्या विचारण्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचारी सक्रिय झाले होते. काही झाले तरी या गुन्ह्याचा तपास करायचाच, असे ठरवून हे पथक कामाला लागले होते. यासाठी या पथकातील कर्तबगार कर्मचाऱ्यांनी आपापल्या पातळीवरून मोठ्या प्रमाणात गुप्त बातमीदार नेमले होते, आणि त्या दृष्टीने मोटार सायकल चोरांचा शोध सुरू होता.
सन 2025 हे नवीन वर्ष चांगले जावे, म्हणून प्रत्येक जण प्रयत्नरत होता, यादरम्यान उदगीर ग्रामीण पोलीस मात्र वेगवेगळ्या गुन्ह्याच्या तपासासाठी धडपडत होते. कर्मधर्म संयोगाने पोलीस प्रशासनाला यामध्ये चांगले यश आले. दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोटार सायकल चोरी गेल्याच्या संदर्भात फिर्याद उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आली होती. त्याचा तपासही पथकाने सुरू केला होता. या संदर्भात गुन्हा रजिस्टर नंबर 11/25 कलम 303 (2) भारतीय न्यास संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. आणि याच्याही तपासाच्या संदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांना प्राधान्य देत पोलीस उपनिरीक्षक भिसे, राम बनसोडे, नाना शिंदे, नामदेव चेवले , राजकुमार डबेटवार, सचिन नाडागुडे, राहुल नागरगोजे यांच्या विशेष पथकाने प्रयत्न चालवले होते.
त्या प्रयत्नाला यश आले, आणि त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राहुल नवनाथ पवार (रा. कुणकी, तालुका जळकोट जिल्हा लातूर) यांच्या ताब्यामध्ये असलेली मोटारसायकली चोरीची असावी. त्या अनुषंगाने बातमीची शहानिशा करून उदगीर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आपल्या पथकाचा मोर्चा राहुल नवनाथ पवार या आरोपीकडे वळवला. त्याला ताब्यात घेऊन विश्वासाने त्याच्याकडून माहिती मिळवली. या पथकाच्या तपास पद्धतीला यश आले, आणि सदरील आरोपीने 12 होंडा शाइन कंपनीच्या मोटारसायकली, 4 पॅशन प्रो कंपनीच्या मोटारसायकली, 6 प्यशन कंपनीच्या मोटारसायकली अशा एकूण 22 मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली, आणि मोटारसायकली पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिल्या.
या मोटारसायकली त्याने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून, नांदेड येथील वजीराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून, भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड यांच्या हद्दी मधून, पुणे येथील हडपसर पोलिसांच्या हद्दी मधून, लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून, नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस स्टेशन हद्दी मधून, इतवारा पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून, लातूरच्या गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून, नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटारसायकली चोरल्या होत्या. त्या अनुषंगाने त्या त्या पोलिस ठाण्यात गुन्हेही नोंद झालेले आहेत. त्या गुन्ह्यातील गेला माल पोलिसांना आढळून आल्याने, गुन्हे उघड करण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे.
या व्यतिरिक्तही अनेक मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्या कोणत्या ठिकाणावरून जप्त झाल्या? या संदर्भात शोध सुरू असून याच्या व्यतिरिक्तही इतर अनेक गुन्हे उघड होतील, अशी शक्यता पोलीस प्रशासनाला वाटत आहे. जवळपास 19 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल उदगीर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जप्त केला आहे. त्यामुळे उदगीर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेबद्दल जनतेच्या मनामध्ये एक आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामाबद्दल निश्चित जनतेमधून पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *