भारतीय स्वातंत्र्याची चिरफाड करणारी साहित्यकृती म्हणजे फ्रॅक्चर्ड फ्रीडम. – डॉ. क्रांती मोरे.
उदगीर (एल.पी.उगीले) भारतीय शासन व्यवस्था आणि राजकारणाचा लेखाजोखा मांडताना सत्य आणि न्यायाप्रती असलेली बांधिलकी, स्वतःच्या विचारावरचा ठाम विश्वास यातून तुरुंगात देखील उपोषण आंदोलने करावी लागतात. हे किती दुर्दैवाचे आहे. संबंध नसताना शिक्षा भोगणारे, इतरांसाठी आयुष्य वाया घालवतात. भारतीय न्यायव्यवस्थेत न्याय हा कसा महाग आहे? शिवाय तो मिळणे ही किती अवघड आहे? हे सांगत भारतीय स्वातंत्र्याची चिरफाड करणारी साहित्यकृती म्हणजे फ्रॅक्चर्ड फ्रीडम होय, असे मत डॉ. क्रांती मोरे यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचक संवादाचे ३२८ वे पुष्प शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथील इंग्रजी विभागातील प्रा.डॉ.क्रांती विठ्ठल मोरे यांनी गुंफले. त्यांनी कोबाड गांधी लिखित व अनघा लेले अनुवादित फ्रॅक्चर्ड फ्रीडम या ग्रंथावर भाष्य करताना सांगितले की, उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना किती संघर्ष करावा लागतो, जन चळवळीतील कार्यकर्त्यांना पद्धतशीरपणे न्यायालयीन लढाईत गुंतवून तुरुंगात डांबून त्याचा आवाज कसा बंद करण्याचा प्रयत्न केला जातो? हे सांगतानाच येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षित व निकोप वातावरण द्यायचे असेल तर विचारावर बंधन, बोलके सुधारक व करते सुधारक मानवतावादी बनवण्याचा विचार रुजवला पाहिजे असे ठासून सांगितले. यावेळी श्रोत्यातून अनेकांनी प्रस्तुत पुस्तकावर चर्चा केली.
बालवाचक साईविश्व बिरादार यांनीही इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट ग्रंथावर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात सौ. उषाकिरण बिरादार म्हणाल्या, वाचक संवाद हा वाचनसंस्कृती व संस्काराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप ढगे, संवादकांचा परिचय अर्चना नळगीरकर यांनी करून दिला तर आभार डॉ.म.ई.तंगावार यांनी मानले.