आषाढी वारीवर निर्बंध; विश्व हिंदू परिषद करणार आंदोलन
लातूर (प्रतिनिधी) : शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या आषाढी वारीवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.सरकारच्या या जुलमी निर्णयाच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दि.१६ जुलै रोजी जिल्हा आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे लातूर विभागीय मंत्री ॲड.सुजित देशपांडे व महानगर मंत्री ॲड.प्रणव रायचुरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.आषाढी वारी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे.
शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.अगदी निजाम राजवटीतही वारी सुरुच होती.वारीला कोणतीही आडकाठी नव्हती.सध्या राज्यात असणाऱ्या तीन पक्षांच्या सरकारने मात्र वारीवर निर्बंध घातले आहेत.हा निर्णय चुकीचा आहे.सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद निषेध करत असल्याचे ते म्हणाले. यांनी सांगितले की,कोरोनाविषयक नियम पाळून मर्यादित संख्येत आम्ही पंढरपूरला जाण्याची तयारी दर्शवली होती.वारी २० दिवसांऐवजी १० दिवस करावी.गरज असेल तर केंद्रीय पोलिस बल मागवावे.दिवसा वारीमुळे संसर्गाचा धोला असेल तर रात्रीच्या वेळी जाण्याची परवानगी द्यावी.मुक्काम गावाबाहेर करण्यासह आणखी काही नियमांचे पालन करत वारीला आम्ही परवानगी मागितली होती. पण सरकार तयार झाले नाही. संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव महाराज,संत सोपानदेव महाराज,संत एकनाथ महाराज,संत नामदेव महाराज,संत तुकाराम महाराज यांच्या पालखांसह इतर संतांच्या पालख्याही पंढरपुरात येत असतात.या दिंड्यांसह किमान २ वारकऱ्यांना जाण्यास परवानगी द्यावी.प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी.लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या वारकऱ्यालाच सहभागी होवू द्यावे,अशा मागण्याही त्यांनी केल्या.
सरकारने वारीला परवानगी नाकारल्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दि.१६ जुलै रोजी लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भजनी आंदोलन केले जाणार आहे.त्यानंतरही सरकारने परवानगी दिलीच नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक गावात एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.गाव हेच पंढरपूर आणि झाड हाच पांडुरंग असे समजून झाडाच्या स्वरूपातील विठ्ठलाची पूजा प्रत्येक गावातीलवारकरी करतील, असेही यावेळी बोलताना सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस महानगर अध्यक्ष बालाजीराव गवळी, हभप भरत भिंगोलीकर महाराज,हभप बाबू महाराज शिवलकर,मठ व मंदीर संपर्क प्रमुख वासुदेवाचार्य कमठाणकर,प्रखंड अध्यक्ष गौरीशंकर कौळखेरे आदींची उपस्थिती होती.