जळकोट रोड ते देगलूर रोड पर्यंतचा पाणंद रस्ता खुला करून द्या – नागरिक पुन्हा आक्रमक

उदगीर (एल.पी उगीले) शहा लगत असलेल्या जळकोट रोड ते शासकीय आयटी आय कॉलेज महादेव मंदिर देगलूर रोड पर्यंतचा निजामकालीन पाणंद रस्ता खुला करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी मागील बरेच वर्षांपासून लावून धरली आहे,परंतु प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे आजपर्यंत डोळेझाक केली आहे, या भागातील नागरिकांना पाणंद रस्ता सोडून दुसरा रस्ताच नसल्याने, रस्त्या अभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे,रस्ता नसल्याने या भागात मूलभूत सुविधेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिका प्रशासन या परिसरातील नागरिकांकडून कर वसूल करते परंतु कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नाही. या सर्व बाबींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळकोट रोड ते देगलूर रोड पर्यंतचा नकाशावरील शासकीय पाणंद रस्ता मोकळा करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,या मागणीसाठी परिसरातील रहिवाशांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे .