उदगीरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू, एमआयडीसीची भूसंपादन प्रक्रियेला वेग, मोठे उद्योग उभारणार : आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर मतदार संघाला भौतिक दृष्ट्या सक्षम करून या मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने विकासाचा आराखडा तयार करून काम करणारे या भागाचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री तथा विद्यमान आ.संजय बनसोडे यांनी एमआयडीसीच्या कामासाठी विशेष लक्ष दिले आहे. आपल्या मंत्रिपदाच्या कार्य काळात विविध विकास योजना आखून उदगीर व जळकोट मतदार संघाचा कायापालट केला. याबरोबरच आपल्या भागातील तरुणांना आपल्या भागातच रोजगार उपलब्ध व्हावा, म्हणून एमआयडीसी मंजूर केली. आता या एमआयडीसीला लागणाऱ्या जागेसाठी भूसंपादनाचे प्रक्रियेला वेग येत असून जिल्हाधिकाऱ्यामार्फत आदेश देण्यात आले आहेत. यामुळे या भागातील एमआयडीसी लवकरच सुरू होऊन या भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. अशी अपेक्षा राज्याचे माजी क्रीडामंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या पाच वर्षापासून सातत्याने चर्चेत राहणाऱ्या उदगीरच्या एमआयडीसी प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी रीतसर 108 शेतकऱ्यांना नोटीसा देऊन 124 हेक्टर 24 आर जमीन संपादित करण्याबाबतच्या कारवाईला सुरुवात केल्याने, उदगीरकरांचे पन्नास वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
यासाठी माजी मंत्री उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी गेल्यावेळी मंत्रीपदी असताना सातत्याने पाठपुरावा करून उदगीरची एमआयडीसी मंजूर करून घेतली होती. राज्याचे तत्कालीन औद्योगिक विकास मंत्री उदय सामंत यांनी याला मंजुरी दिली होती. व राज्याचे मुख्य औद्योगिक विकास प्रकल्प संचालक यांनी दोन वेळा उदगीरला भेट दिली होती. या नियोजित उदगीर औदयोगिक क्षेत्रासाठी मौजे कासराळ येथील १२४.२४ हे. आर. खाजगी क्षेत्र महाराष्ट्र औदयोगिक विकास अधिनियम १९६१ चे प्रकरण ६ च्या तरतुदी लागू करुन महाराष्ट्र शासन, उदयोग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने क्षेत्र अधिसुचित करण्याची अधिसुचना ऑगस्ट २०२४ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केली होती.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना कासराळ (ता.उदगीर) येथील १२४.२४ हे. आर खाजगी क्षेत्र भूसंपादन करण्याकरीताच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ याच्या कलम ३२ (२) नुसार संबंधित शेतकऱ्यांना नोटीस देवुन भूसंपादन करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी कासराळ येथील औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीसा दिल्या आहेत. या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय बनसोडे हे आमदार झाले. त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले, त्यानंतर त्यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्पाच्या दृष्टीने आराखडा आखला. कित्येक प्रकल्प पूर्णही केले. जनतेच्या मागणीत असलेला आणि प्रलंबित पडलेल्या एमआयडीसी चा प्रश्न हाताळून, त्याचा पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळाली, या संधीचे सोने करत त्यांनी उदगीरच्या सर्वांगीण विकासा सोबतच उदगीरच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केल्यामुळे उदगीरचा पन्नास वर्षापासून रखडलेल्या प्रश्नाला न्याय मिळाला आहे. यातून उद्योग उभारले जाणार असून उदगीरच्या बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे. या भागाच्या विकासाला नक्कीच चालना मिळणार असल्याने या भागातील नागरिकांनी आ.संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.