श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्या श्वेता हुनसनाले यांना उत्कृष्ट वाचक विद्यार्थी पुरस्कार

0
श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्या श्वेता हुनसनाले यांना उत्कृष्ट वाचक विद्यार्थी पुरस्कार

उदगीर (एल.पी.उगीले)
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने २०२४-२५ पासून उत्कृष्ट वाचक विद्यार्थी पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षीचा पुरस्कार बी.कॉम.तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु.श्वेता बळीराम हुनसनाले यांना देण्यात आले. प्रमाणपत्र, ग्रंथ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ.यु.एस.धसवाडीकर यांनी आपले वडील दलित साहित्यिक, ज्यांना अण्णाभाऊ साठे यांचा सहवास लाभला असे आंबेडकरी चळवळीतील विचारवंत सिताराम धसवाडीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक हजार एक रुपयांचे पारितोषिक देखील या विद्यार्थिनीला दिले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी. एमेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक , आयटी तज्ज्ञ, तसेच विज्ञान व विवेक या विषयाचे अभ्यासक डॅनिअल मस्करणीस,पुणे हे उपस्थित होते. याशिवाय मंचावर उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे यांची उपस्थिती होती. ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.यु.एस.धसवाडीकर यांनी करून दिला. याप्रसंगी पुरस्कारप्राप्त विद्यार्थिनी कु.श्वेता हुनसनाले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे डॅनिअल मस्करणीस म्हणाले, माहिती तंत्रज्ञान जितकं चांगलं आहे, तितकंच वाईट देखील आहे. कारण अनेक फेक न्यूज माध्यमावर येत आहेत. त्यामुळे कोणती बातमी खरी आणि खोटी हे तपासूनच आपले मत तयार करावे. ग्रंथ उत्तम मार्गदर्शक असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात रममान व्हावे. अशा पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळत असते.
ग्रंथामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. अनेक संशोधक, महामानवांनी वाचन संस्कृतीच्या माध्यमातूनच समाजाचे प्रबोधन केलेले आहे. असे विचार उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे यांनी व्यक्त केले. ग्रंथाच्या वाचनामुळे विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडत असतात. ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. असे अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीतील डॉ. ईश्वर शेरे, डॉ.म.ई. तंगावार, डॉ.एम.बी. कातकडे व आर.एम. बोयने यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीतील सदस्य प्रा.जे.डी.संपाळे तर आभार समितीचे प्रमुख ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!