शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

0
शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कॅन्सरसारखे गंभीर आजार होतात. अशा आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांवर संकट कोसळते. यासोबत या पदार्थांचे सेवन अस्वच्छतेला कारणीभूत ठरत असल्याने, शासकीय कार्यालयात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केल्या आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालया मार्फत आयोजित विविध समितींच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. अशोक सारडा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद कलमे, लातूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर भारती, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य विभागातील अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे आजार जीवघेणे असल्यामुळे या पदार्थ्यांच्या व्यसना पासून सर्वांनी दूर राहणे आवश्यक आहे. या व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाने समुपदेशन आणि जनजागृती उपक्रमांचे आयोजन करावे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनाने कॅन्सरसारखा आजार होवून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय स्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमासाठी स्वतंत्र पथक स्थापन करावे. यामध्ये आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्या सोबत पोलीस, महसूल, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश करावा. या पथकाने प्रत्येक आठवड्यात अचानकपणे गुटखा विक्रीच्या अनुषंगाने तपासणी मोहीम राबवावी, असे त्यांनी सांगितले.

सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याच्या सूचना

जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या होवू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे. सध्या याबाबतच्या कोणत्याही घटना जिल्ह्यात घडलेल्या नसल्या तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी करण्याची मोहीम प्रत्येक ग्रामीण रुग्णालय स्तरावर राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. तसेच गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्याबाबत जिल्ह्यात प्रशिक्षणाचे आयोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

10 ऑक्टोबर 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या तंबाखू मुक्त युवा अभियान अंतर्गत तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनमुक्तीविषयी जनजागृतीकरिता आयोजित रिल्स स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त उमेश गावकरे यांना 7 हजार रुपये, द्वितीय क्रमांक प्राप्त डॉ. सिद्धेश्वर हुकीरे यांना 5 हजार रुपये व तृतीय क्रमांक प्राप्त कपिल वाघमारे यांना 3 हजार रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देवून जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम समितीचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!