उदयगिरी महाविद्यालयाने अंध विद्यार्थ्यांसाठी आधारवड व्हावे – ब्रेलमॅन स्वागत थोरात

उदगीर : (एल.पी.उगीले) अंध व्यक्ती समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांना देखील सर्वसामान्य माणसाप्रमाणे आयुष्यात जगता आले पाहिजे. अंध व्यक्तींना शिकण्याचा, नोकरी-व्यवसाय करण्याचा, आपल्या आयुष्यात प्रगती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो अधिकार आपण सर्वांनी अंध व्यक्तींना दिला पाहिजे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय अंध विद्यार्थ्यांसाठी आधारवड व्हावे, असे मत भारताचे ब्रेलमॅन स्वागत थोरात यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिव्यांग समितीच्या वतीने आयोजित सामाजिक कार्य गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव रामप्रसाद लखोटिया हे होते. यावेळी व्यासपीठावर अंध विद्यार्थी कार्यशाळा प्रशिक्षक स्वरूपा देशपांडे, अर्चना पैके, प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के, उपप्राचार्य एस. जी. कोडचे , पर्यवेक्षक प्रा. संजय मुडपे यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना स्वागत थोरात म्हणाले, अंध विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा यासाठी महाविद्यालयात ब्रेल लायब्ररी, ऑडिओ लायब्ररी याची स्वतंत्र व्यवस्था असावी. लेखनिकाशिवाय अंध विद्यार्थ्याला स्वतःच्या परीक्षा देता याव्यात, असे वातावरण महाविद्यालयात निर्माण करण्यासाठी प्राध्यापकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपस्थितांना केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. रामप्रसाद लखोटिया म्हणाले, माणूस ध्येयवेडा असला की अशक्य गोष्टीही शक्य होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वागत थोरात हे आहेत. अंध विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात स्वतंत्र दालन निर्माण केले जाईल, व दिव्यांग समितीच्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी सोडविल्या जातील. यावेळी अर्चना पैके, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरव जेवळीकर यांनी तर आभार प्राध्यापक सचिव डॉ. भालचंद्र करंडे यांनी मानले.