आगामी सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत – पोलीस अधीक्षक सोमय मुंडे.

0
आगामी सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत - पोलीस अधीक्षक सोमय मुंडे.
लातूर (एल.पी.उगीले) श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसेश्वर जयंती आणि गुढी पाडवा व रमजान ईद हे सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्यासाठी सर्वांनी जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे.      
         तसेच या कालावधीत जिल्हा पोलिसांची सोशल मीडियवर करडी नजर असून कुणीही सामाजिक एकता व सलोखा तसेच शांतता भंग करणारा मजकूर प्रसारीत करू नये, असे आवाहनही पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले.

लातूर जिल्हा प्रशासनाच्या मार्फत गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील डी पी डी सी हॉलमध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला जिल्हाधिकारी वर्ष ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे,निवासी जिल्हाधिकारी नेटके, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्यासह शांतता समिती सदस्य,सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
आगामी सण व उत्सवाचा काळ लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. सण-उत्सव साजरे करताना न्यायालयांच्या तसेच प्रशासनाच्या आदेशांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना बैठकीमध्ये करण्यात आल्या. सण उत्सव लक्षात घेता होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्गाची नियोजन करण्यात येणार आहे.तसेच या कालावधीत रुग्णवाहीका तैनात ठेवाव्यात. याबरोबरच फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील सुसज्ज ठेवाव्या.अनेकदा मिरवणूक मार्गांवर अंधार असतो त्या ठिकाणी लाईट ची व्यवस्था करावी.तसेच याकाळात वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्ष ठाकूर घुगे व आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी यांनी उपस्थित विभाग प्रमुख यांना दिले.
समाज माध्यमांवर करडी नजर
सण उत्सवादरम्यान शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे अनुचित प्रकार होणार नाहीत. तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर व इतर समाज माध्यमांवर तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरुध्द् लातूर जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल मार्फत सोशल मीडियावर 24 तास विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी जिल्ह्यातील जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी समाज माध्यमांवरील घटनांचे विश्लेषण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे.सर्वांनी सामाजिक शांतता ही नैतिक व सामूहिक जबाबदारी मानून कार्यक्रम करावेत. तसेच पोलीस प्रशासनाने देखील ज्या मिरवणूक व कार्यक्रम यांना ज्या नियमाच्या आधारे परवानगी दिली आहे, त्याचे पालन करावे. या कार्यक्रमात शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे निर्देश देऊन सर्व सण उत्सव उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले. जिल्ह्यात विविध सण आणि उत्सवांच्या निमित्ताने अनेक शोभायात्रा, मिरवणुका, रॅली आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाची माहिती दिली.
जिल्ह्यात गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा, मिरवणुकाचे आयोजन करण्यात आले आहे. रमजान ईद निमित्त जिल्ह्यात ईदगाह, मज्जिद च्या ठिकाणी नमाज पठण कार्यक्रम होणार आहे. श्रीराम नवमी उत्सव निमित्त मिरवणुका इतर कार्यक्रम होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे मिरवणुका, पुतळा पूजन आणि प्रतिमा पूजन कार्यक्रम होणार आहेत. या सर्व काळात पोलीस प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात विशेष दहशतवादी विरोधी पथक, सोशल मीडिया देखरेख पथक, आरसीपी प्लॅटुन, क्यू आर टी प्लॅटुन यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे. तसेच भारतीय न्याय संहिते अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाया आणि दंगाकाबू रंगीत तालीम विविध ठिकाणी करण्यात आले असल्याचे सोमय मुंडे यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी आभार प्रदर्शन केले. शांतता समितीच्या बैठकीत समितीचे सदस्य तसेच पत्रकार यांनी विविध सूचना मांडल्या.वाहतूक कोंडी,वीज पुरवठा, पुरेश्या प्रमाणात पाणी, सीसिटीव्ही उपलब्धता, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविले जाणारे चुकीचे संदेश या विविध सूचनांची जिल्हा प्रशासनाने दखल घेवून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येतील,असे आश्वस्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!