डॉ. ज्ञानोबा मुंढे यांचा जाहीर सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले)गट साधन केंद्र उदगीर येथील विषय साधनव्यक्ती, लेखक डॉ. ज्ञानोबा मुंढे लिखित “अभ्यासाचे तंत्र आणि मंत्र” या पुस्तकाची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या वतीने समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शालेय ग्रंथालयासाठी निवड झाल्याबद्दल लेखक डॉ. ज्ञानोबा व्यंकटराव मुंढे यांचा जाहीर सत्कार महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पंचायत समिती उदगीर येथील सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी उदगीर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रजेश्वर निटुरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके,माजी नगराध्यक्ष उषा कांबळे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, पंचायत समिती उदगीरचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, गटशिक्षणाधिकारी एस के शेख, मल्लिकार्जुन मानकरी, रमेशअण्णा अंबरखाने,माजी जि प सदस्य शिवाजीराव केंद्रे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, प्रा.शाम डावळे यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.
लेखक डॉ. ज्ञानोबा मुंढे यांच्या “अभ्यासाचे तंत्र आणि मंत्र” या पुस्तकाची इयत्ता 4 थी व 5 वी या गटासाठी निवड झाली आहे. याबद्दल डॉ. ज्ञानोबा मुंढे यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या अगोदर भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, आणि मला आदर्श विद्यार्थी बनायचंय ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. मला आदर्श विद्यार्थी बनायचंय या पुस्तकाच्या अडीच महिन्यात चार आवृत्या निघालेल्या आहेत. या पुस्तकासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा अनेक वाचकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.