उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची चौफेर प्रगती, पंचतारांकित मानांकनाकडे वाटचाल

उदगीर (ऍड.एल.पी.उगिले) उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या काही वर्षापासून सतत प्रगतीचा आलेख चालू ठेवला आहे. आणि या प्रगतीच्या आलेखावरून शासनाने नवीन मानांकन जाहीर केले आहेत. त्यामध्ये मागील कार्यकाळात झालेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेत, शासनाने उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीला “अ वर्ग थ्री स्टार” दर्जा दिला आहे. सध्याची प्रगती पाहिल्यास ही वाटचाल पंचतारांकित मानांकडाकडे असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार नवीन वर्गीकरण करण्याच्या बाबतीत स्पष्ट केले आहे की, राज्यात एकूण 305 कृषी उत्पन्न बाजार समिती असून सदर बाजार समितीचे 625 उपबाजार आवार कार्यरत आहेत. शासनाने 2001 मध्ये उत्पन्नानुसार बाजार समितीचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण केलेले आहे. त्यामध्ये अ वर्गामध्ये एक कोटी पेक्षा जास्त उत्पन्न, ब वर्गामध्ये 50 लाख ते एक कोटी उत्पन्न, क वर्गामध्ये 25 लाख ते 50 लाख पर्यंत उत्पन्न आणि ड वर्गामध्ये 25 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा समावेश आहे. सन 23 – 24 अखेर राज्यातील अ वर्गामध्ये 194 बाजार समिती तर ब वर्गामध्ये 54 बाजार समिती आणि क वर्गामध्ये 27 बाजार समिती आणि ड वर्गामध्ये 30 बाजार समित्यांचा समावेश आहे. बाजार समित्यांचे आस्थापना खर्च मर्यादेबाबत शासनाने 28 ऑगस्ट 2014 रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार अ वर्ग बाजार समिती आस्थापना खर्च मर्यादा 45 टक्के आहे, ब वर्ग बाजार समिती आस्थापना खर्च मर्यादा 50% आहे, तर क आणि ड वर्ग बाजार समिती आस्थापना खर्चामध्ये दहा टक्के वाढ करण्या बाबत पणनमंडळ यांनी बाजार समिती यांची आर्थिक परिस्थिती तपासून निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे. पणन विभागामार्फत पुढील शंभर दिवसात करावयाच्या कृती कार्यक्रमात राज्यातील सध्याच्या एक कोटी पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समितीचे रुपये एक कोटी ते दोन कोटी 50 लाख रुपये, दोन कोटी 50 लाख ते पाच कोटी रुपये आणि पाच कोटी ते 10 कोटी आणि दहा कोटी ते 25 कोटी व 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त असे उपवर्गीकरण हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 27 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्रकांमुळे अ वर्गीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपवर्गीकरणासह ब, क, ड बाजार समित्यांच्या वर्गीकरणाबाबत प्रस्ताव शासनात सादर केला आहे. त्या अनुषंगाने अ वर्गीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपवर्गीकरण तसेच ब, क, ड बाजार समित्यांच्या वर्गीकरणाबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने पंचतारांकित बाजार समिती पाच आहेत. ज्यांचे उत्पन्न 25 कोटी पेक्षा जास्त आहेत. अ वर्ग चार स्टार अर्थात दहा कोटी ते 25 कोटी दरम्यानचे उत्पन्न असलेल्या 15 बाजार समिती आहेत, तर अ वर्ग थ्री स्टार अर्थात पाच कोटी ते दहा कोटी दरम्यान चे उत्पन्न मर्यादा असलेल्या 23 बाजार समित्या असल्याचा उल्लेख शासनाच्या परिपत्रकात करण्यात आला आहे. यामध्ये उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती ही अ वर्ग थ्री स्टार मध्ये आलेली आहे.
प्रशासकीय कार्यकाळ असताना या बाजार समितीचे उत्पन्न अत्यंत कमी होते. अक्षरशः कर्मचाऱ्यांच्या पगारां साठी मारामारी होत होती, त्याच बाजार समितीला तत्कालीन नेते स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांनी विकासाचा पाया रचून प्रगतीपथावर आणले. आणि त्यानंतर सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, काँग्रेसचे नेते तथा मुख्य प्रतोद माजी मंत्री आ.अमित देशमुख, माजी आ. धीरज देशमुख यांनी वेळोवेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योग्य मार्गदर्शन केले. यादरम्यान तत्कालीन सभापती शिवाजीराव हुडे, मुन्ना उर्फ सिद्धेश्वर पाटील यांनी बाजार समितीच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले, आणि सुदैवाने आजच्या घडीला उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती एक अत्यंत विकसित अशा स्वरूपातील बाजार समिती म्हणून नावलौकिक झाली आहे.
चौकट……1
उदगीर बाजार समिती पंचतारांकित होईल….
शासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती विकासात्मक टप्पे गाठत आहे. उत्पन्न वाढीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याने व्यापारी, हमाल, मापाडी, आणि शेतकरी या सर्वांच्या प्रगतीचा विचार करून, विविध लोक कल्याणकारी योजना प्रत्यक्ष राबवून आपला एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे. व्यापारी, शेतकरी हे सर्व सहकार्य करत असल्याने प्रगतीचा आलेख सतत चढताच राहील आणि लवकरच अ वर्ग पंचतारांकित मध्ये उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती चे नाव येईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
प्रदीप पाटील,
प्र. सचिव,
कृषी उत्पन्न बाजार समिती, उदगीर
चौकट…..2
योग्य मार्गदर्शन आणि संचालक मंडळाची साथ यामुळेच प्रगतीचे टप्पे शक्य…..
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती विकसित व्हावी, या बाजार समितीचे उत्पन्न वाढावे, आणि ही बाजार समिती लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरोबरीने लोक कल्याणकारी योजना राबवण्यात पुढे यावी. असा उद्देश ठेवून तत्कालीन नेते तथा आमदार स्व. चंद्रशेखरजी भोसले यांनी प्रयत्न केले होते. आज त्यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे. लोककल्याणकारी योजना प्रत्यक्षरीत्या राबवण्यामध्ये उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती सतत अग्रेसर राहिली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लातूरचे सुपुत्र स्व. विलासरावजी देशमुख साहेब, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते तथा काँग्रेसचे मुख्य प्रतोद आ. अमितभैय्या विलासरावजी देशमुख, माजी आ. धीरजभैया देशमुख यांनी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी आम्हा सर्व संचालक मंडळांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. संचालक मंडळ ठरवण्यापासून ते संचालक मंडळाच्या विजयापर्यंत त्यांनी सतत सहकार्य केले आहे. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच लोकनेते स्व. चंद्रशेखरजी भोसले यांचे स्वप्न साकार होते आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वांगीण प्रगती व्हावी, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे.
प्रीती चंद्रशेखर भोसले
सभापती,
कृषी उत्पन्न बाजार समिती, उदगीर.