लातूर विमानतळ पुन्हा एमआयडीसीकडे; अटी-शर्तींचा भंग केल्याने करार संपुष्टात

लातूर (एल.पी.उगीले) : येथील विमानतळ ८ एप्रिल रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पुन्हा आपल्या ताब्यात घेतले आहे. हे विमानतळ मे. लातूर एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीला ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. मात्र, अटी व शर्तींचा भंग केल्याने याबाबतचा करार संपुष्टात आणून एमआयडीसी प्रशासनाने हे विमानतळ ताब्यात घेण्याची कार्यवाही केली आहे.
लातूर येथील हवाई धावपट्टी ११ मे २००० रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यात आली होती. त्यानंतर धावपट्टीच्या विस्तारीकरण, रुंदीकरण आणि मजबुतीकरणानंतर ३ नोव्हेंबर २००९ रोजी हे विमानतळ मे. लातूर एअरपोर्ट प्रा. लि. यांना ९५ वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आले होते. करारानुसार कंपनीने विमानतळाची देखभाल, दुरुस्ती, विकासकामे, विमानसेवा सुरू करणे, प्रवाशांसाठी सुविधा,आंतरराष्ट्रीय टर्मिनल,कार्गो सेवा आणि शीतगृह सुविधा उपलब्ध करणे अपेक्षित होते. मात्र, ही कामे पूर्ण करण्यात कंपनी अपयशी ठरल्याने याबाबतचा करार संपुष्टात आणण्यात आला आहे.
एमआयडीसी प्रशासनाने ८ एप्रिल रोजी पंचनामा करून विमानतळाचा ताबा परत घेतला. यावेळी प्रादेशिक अधिकारी अमित आर. भामरे, कार्यकारी अभियंता यु.जी.टेंभुर्णीकर , क्षेत्र व्यवस्थापक बी. पी. यलमटे, कनिष्ठ अभियंता ओमकार बिरादार आणि पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.