जे जनतेची सेवा करतात, त्यांनाच मान सन्मान मिळतो -प्रशांत महाराज खानापूरकर

उदगीर (एल.पी.उगीले)
मानपानाची अपेक्षा सर्वांनाच असते मात्र सर्वांना हा मान मिळत नाही मान त्यांनाच मिळतो जे मनातून जनतेची सेवा करतात. असे प्रतिपादन प्रशांत महाराज खानापूरकर यांनी केले.
देवणी तालुक्यातील तळेगाव (भो.) येथे आयोजित श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये राम जन्मकथा प्रसंगी दशरथांचे महात्म्य सांगत असताना ते बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी, राजा दशरथांना स्वर्गातील इंद्र सुद्धा सन्मानाने उठून जागा देत होता. याचे कारण दशरथ महाराजांनी केलेली समाजाची सेवा. आजही जी माणसं प्रामाणिकपणे समाजाची सेवा करतात, अशा लोकांना मान सन्मान मिळतो. मात्र या उलट काही लोक समाजाची सेवा न करता पण मानाची अपेक्षा करतात. त्यांना नेहमी अपमानित व्हावे लागते. मानपाणाची अपेक्षा न करता फक्त जनसेवेची कास धरा, कुठल्याही क्षेत्रामध्ये सेवा हे तुम्हाला मोठे करते. कीर्तन असेल, प्रवचन असेल, राजकारण असेल किंवा धर्मकारण असेल या सर्व क्षेत्रांमध्ये जीव ओतून सेवा करत चला, ही सेवा एक दिवस तुम्हाला खूप मोठ्या पदावर नेऊन पोचवते. मान हा पैशाने किंवा वयाने मिळत नसून तो स्वकर्तृत्वाने, कष्टाने आणि सेवेने मिळतो. असे सांगून एखाद्या कामामध्ये तुम्हाला अपयश आले म्हणून निराश होऊ नका. पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा. सेवा, सातत्य, आपुलकी, जिव्हाळा कायम ठेवा. यश आणि मान नक्कीच मिळेल असे मौलिक विचार प्रशांत महाराज खानापूरकर यांनी मांडले. रामायनातील विविध कथानकाला स्पर्श करत असताना सध्याच्या समाजातील अनेक सामाजिक समस्या यावेळी त्यांनी मांडल्या. अमोघ वाणी, सुंदर संगीताची साथ आणि हजारो भाविकांची उपस्थिती यामुळे रामकथेत मोठा आनंद निर्माण होत असून सोमवारी श्री राम जन्मप्रसंगांमध्ये उपस्थित सर्व भाविकांनी आनंद घेतला. रामनामाच्या महतीने आणि रामनामाच्या गजराने तळेगाव आणि परिसर दुमदुमून गेला आहे. दि. ११ एप्रिल पर्यंत श्री राम कथा चालणार असून दि. १२ एप्रिल रोजी दुपारी काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशासाठी भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन भगवानराव पाटील तळेगावकर यांच्यासह गावातील सर्व भाविक परिश्रम घेत आहेत.