डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर व महात्मा फुले जयंती निमित्त मौखिक व दंतरोग तपासणी व उपचार शिबीर

उदगीर (एल.पी.उगीले) विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त उदगीर येथे गेल्या २८ वर्षांपासून सेवा देत असलेल्या सेवा दंत रुग्णालयाच्या वतीने सेवा दंत रुग्णालय येथे दि. ११ ते १३ एप्रिल दरम्यान स. ११ ते दु. २ यावेळेत मौखिक व दंतरोग तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबीराचे उद्घाटन माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांची उपस्थिती असणार आहे. तसेच याप्रसंगी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पांडुरंग दोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन राठोड, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, आयडीए लातूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. शिल्पा लटुरिया, आयएमए उदगीरचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील, आयडीए लातूर शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. विजय करपे, आयडीएचे भावी अध्यक्ष डॉ. संजीवकुमार बिरादार, जिल्हा रुग्णालयाचे माजी अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार, निमाचे अध्यक्ष डॉ. राजकुमार घोणसीकर, होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोठारे, स्त्री रोग तज्ञ डॉ. दीपक सोमवंशी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबीरामध्ये तपासणीसाठी आलेल्या रुग्णांचे तोंडातील व दातामधील सर्व आजारांचे निदान केले जाणार आहे व उपचार सांगितले जाणार आहेत.
जसे कि, तोंडाचा कॅन्सर,
जबड्यातील व दातांचे व्यंग, जबड्याचे व दातांचे आजार,
हिरड्यांचे आजार,दातांच्या नसेचा आजार व दातांचे इम्प्लांट आदी. याप्रसंगी मोफत तपासणी व मोफत एक्सरे काढून निदान केले जाणार आहेत. तसेच सर्व गरजू रुग्णांवर सवलतीमध्ये उपचार केले जाणार आहेत.
या शिबीरात डॉ. राहुल लटुरिया लातूर, डॉ. विष्णुदास भंडारी लातूर, डॉ. अक्षय गीलडा लातूर, डॉ. संदीप दंडे लातूर, डॉ. मंगेश काशीद अंबेजोगाई सह उदगीर तालुक्यातील व शहरातील दंत रोग तज्ञ डॉक्टर्स सेवा देणार आहेत. या शिबीराचा जनतेनी लाभ घ्यावा असे आवाहन या रुग्णालयाचे संचालक डॉ. गोविंद सोनकांबळे व माजी नगराध्यक्षा उषा कांबळे यांनी केले आहे.