सर्वसामान्यांना महावितरणचा दरवाढीचा शॉक, प्रति युनिट 60 पैशांनी वीज महागली!!

उदगीर (एल.पी.उगीले) महाराष्ट्रात एक एप्रिल पासून वीज स्वस्त होणार म्हणून नागरिक आनंदात असतानाच, महावितरण स्वस्त विज देण्यास आक्षेप घेतल्याने महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाने याबाबतचा निर्णय स्थगित ठेवला आहे. त्याच दरम्यान महावितरणने परिपत्रक काढून घरगुती ग्राहकांची वीज प्रति युनिट 60 पैशांनी महाग केली आहे. यासाठी इंधन समायोजन शुल्क एफ एस सी चा आधार घेण्यात आला आहे. एका बाजूला सिलेंडर पन्नास रुपयांनी महाग झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला आता वीज महाग करत सरकारने सर्वसामान्यांना चांगलाच झटका दिला आहे.
शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय फेटाळून लावत, शेतकऱ्यांनी कर्जाचे पैसे भरावेत असा आदेश सरकारने काढला आहे. त्यामुळे शेतकरीही प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यात या महागाईच्या भस्मासुराने आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे.
वीज कंपनीच्या सूत्रानुसार मागच्या वर्षी उन्हाळा आणि त्यानंतर मान्सून मध्ये वीज पुरवठा कमी झाल्याने बाहेरून महाग वीज खरेदी करण्यात आली होती. आता त्याच्या भरपाईसाठी ग्राहकाकडून इंधन समायोजन शुल्क वसूल करावे लागेल असे म्हणून परिपत्रक काढून कंपनीने जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील विजेची मागणी 30,000 मेगावाटच्या जवळ पोहोचली आहे. राज्यात सात एप्रिलला सर्वाधिक मागणी 29 हजार 411 मेगावॅट होती. त्यामध्ये मुंबईच्या 3753 मेगावॅटचा ही समावेश आहे. तर दुसरीकडे राज्यात खाजगी कारखान्यासह उत्पादन 18 लाख 5 हजार 33 मेगावॅट इतके होते. उर्वरित मागणी केंद्रीय कोठा आणि पावर एक्सचेंज द्वारे पूर्ण करण्यात आली, दुसरीकडे चंद्रपूर, खापरखेडा आणि भुसावळ मधील प्रत्येकी एक युनिट बंद आहे. अशा स्थितीत महावितरणला महागडी वीज खरेदी करावी लागणार आहे. परिणामतः नागरिकांना एसएससी द्वारे यापुढेही आर्थिक भार सोसावा लागणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. कंपनीने असेही स्पष्ट केले आहे की, एफ एस सी मार्चच्या वापरावरच लागू केला जाईल मात्र महावितरण चे वीज खरेदीचे महागडे दर वसुली येत्या काही महिन्यात ही सुरूच राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम घरगुती ग्राहकासह प्रत्येक वर्गावर होणार आहे. या वर्गवारीनुसार व्यावसायिक ग्राहकांना 40 ते 60 पैसे, कृषी ग्राहकांना 15 ते 30 पैसे, पथदिवे 30 ते 35 पैसे , पाणीपुरवठा योजना 30 ते 35 पैसे, ईव्ही चार्जिंग स्टेशनला 40 पैसे आणि उद्योगांना 35 ते 40 पैसे अधिक द्यावे लागतील. या वीज दरवाढीचा शॉक लागल्यानंतर जनता प्रचंड वैतागली आहे. निवडणुकीच्या दरम्यान एक भाषा बोलायची आणि निवडून आल्यानंतर दिलेली आश्वासने विसरून जायची, अशी स्थिती पाहून या सरकारवरचा विश्वास उडाला आहे. अशी चर्चा आता सर्रास चालू झाली आहे.